सोलापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सकल मराठा समाजाचे नेते व खासदार संभाजीराजे छत्रपती हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपले मत व्यक्त केले.
उस्मानाबाद येथील दौऱ्यानंतर खासदार संभाजीराजे हे सोलापूर येथील बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही वेळ थांबले होते. माध्यमांशी मनसोक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मी तुळजापूरमध्ये संतापलेल्या मराठा समाजाला शांत करण्यासाठी वेळप्रसंगी तलवार काढेन, असे वक्तव्य केले होते. मात्र, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी चुकीचा अर्थ काढत समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मी तुळजापुरात गेलो नसतो तर मोठा उद्रेक निर्माण झाला असता, असेही संभाजीराजे म्हणाले.
तुळजापुरात ठोक क्रांती मोर्चा वेळी मराठा बांधव खवळले होते. म्यानातून तलवारी काढण्याची परवानगी द्या, असा जनतेतून आक्रोश दिसत होता. त्यावेळी मी वेळप्रसंगी तलवार काढू असे म्हणालो. परंतु, माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला आहे. 2014 पासून राज्य सरकारने मराठा समाजाचे प्रश्न सोडविले आहेत का? महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 32 टक्के आहे. मग त्यांना वेळेवर मदत का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, नुसते आकडे नको असे ते म्हणाले.