सोलापूर - शहरांमध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे एकाच वेळी सर्वच ठिकाणी रस्ता खुदाईचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहने हाकणे अवघड झाले आहे. सोलापुरातील नागरिकांना व बाहेरून आलेल्या प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. स्मार्ट सिटीत समावेश असणारे सोलापूर शहर हे खड्ड्यांचे शहर म्हणून नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. सोलापूर हे स्मार्ट सिटी आहे का खड्ड्यांची सिटी, असा सवाल संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे.
आज दुपारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोलापूर शहर नव्हे तर खड्डापूर शहर असे फलक लावून महानगरपालिकेला सुबुद्धी यावी व लवकरात लवकर हे शहर खड्डेमुक्त होऊन चांगले रस्ते व्हावे यासाठी खड्ड्यातच आंदोलन करण्यात आले.
सोलापूर शहरात वाहन चालवणे म्हणजे तारेवरची कसरत -
सोलापूर शहरात ड्रेनेज व जलवाहिनी टाकण्याची कामे सुरू आहेत. यामध्ये शहरातील सर्वच रस्त्यावर सर्वाधिक भागांमध्ये रस्त्यांची खुदाई केलेली आहे. अनेक ठिकाणी तीन ते चार फुटाचे खड्डे खणण्यात आले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा प्रश्न अधिकच अडचणीचा बनला आहे. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. या रस्त्यावर चारचाकी वाहने चालवणे अवघड झाले आहे. पादचाऱ्यांना पायी जाण्यासाठी रस्ता नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोबाईल गल्ली, नवी पेठ, फौजदार चावडी, चाटी गल्ली, मधला मारुती, भांडे गल्ली व हद्दवाढ आदी भागांमधील सर्व रस्ते खोदकामामध्ये अडकले आहेत. खड्डेमय रस्त्यांवर वाहन चालवल्याने मान आणि मणक्याचे दुखणे सुरू झाले आहे. शहरात वाहन चालवणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे.
खड्ड्यामुळे मानवी शरीरावर परिणाम -
वृद्धांना कंबरेचा त्रास होत आहे. तसेच वाहनांचे देखील नुकसान होत आहे. अधिक धूळ तयार होऊन श्वसनाचे व डोळ्याचे आजार निर्माण होत आहेत. अनेक वाहनधारकांना हाडांचे व मणक्यांचे त्रास सुरू झाले आहेत. स्मार्टसिटीच्या नावाखाली शहर पूर्ण खोदले आहे.
संभाजी ब्रिगेडने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला -
संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरातील खड्ड्यातच आंदोलन करण्यात आले आणि शहर लवकर खड्डेमुक्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, नागेश पवार, उपशहरप्रमुख आशुतोष माने, सीताराम बाबर सोमनाथ पात्रे,सचिव सनी पाटू, राहुल घोडके, महेश तेल्लुर, विजय क्षीरसागर, मेऊल बुरे,इलियास शेख, शाहरुख पटेल, रमेश तरंगे, अक्षय साळुंखे, विनोद झळके, अक्षय जाधव आदी उपस्थित होते.