पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर येथील स्मशानभूमीमध्ये मित्रांमध्ये मटणाच्या पार्टीवरून वाद झाला. त्या वादाचे भांडणात रूपांतर झाले. मात्र यात दोन मित्रांनी त्यांच्या एका मित्रावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समाधान गायकवाड असे चाकू हल्ला झालेल्याचे नाव आहे. चाकू हल्ला करणाऱ्या दोन्ही मित्रांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटकही करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली आहे.
आम्हालाही जेवण द्या म्हणत मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरात समाधान गायकवाड, भारत, बाळा हे तिघे शहरातील स्मशानभूमीजवळ मटणाच्या पार्टीनिमित्ताने गेले होते. त्याठिकाणी समाधान गायकवाडचे मित्र दादा कदम व किशोर बंदपट्टे हे गेले. 'आम्हालाही जेवण द्या' म्हणत समाधान गायकवाडला मारहाण करू लागले. या दोघांनीही समाधान गायकवाडच्या मानेवर चाकूने हल्ला केला. यामध्ये समाधान गंभीररित्या जखमी झाला.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
समाधान गायकवाड गंभीररीत्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याने मित्र दादा कदम व किशोर बंदपट्टे यांनी आपल्यावर चाकू हल्ला केल्याचे सांगितले. यानंतर दादा आणि किशोरला पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली. दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - इगतपुरीत हाय-प्रोफाइल 'रेव्ह पार्टी'वर छापा, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीसह 22 जणांवर कारवाई