पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल दोन मे रोजी जाहीर करण्यात आला होता. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे समाधान अवताडे यांचा 3 हजार 733 मतांनी विजयी झाला होता. आज नवनियुक्त आमदार समाधान अवताडे यांनी मुंबई येथे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनामध्ये आमदारकीची शपथ घेतली आहे. सर्व कोरोना नियमांचे पालन करून हा शपथविधी पार पडला आहे.
मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला शपथविधी सोहळा
राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्य सरकारने राजकीय कार्यक्रमांवर राज्यात बंदी घातली आहे. मात्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची नवनियुक्त आमदार समाधान अवताडे यांचा आमदारकीचा शपथविधी आज विधान भवन येथे पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी मोजक्याच मान्यवरांना परवानगी देण्यात आली होती. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शपथ देली आहे. यामध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अध्यक्ष ऍड.अशिष शेलार, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटीलांची घेतली भेट
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी आमदारकी मिळवली. त्यानंतर आमदार समाधान अवताडे यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह मुंबई येथे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. तसेच माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या घरी जाऊन आभार मानले आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी बाळा भेगडे यांनी प्रभारी म्हणून काम पाहिले होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा केला होता पराभव
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक 17 मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय जनता पार्टी कडून समाधान अवताडे तर महा विकासाकडून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती. यांच्यासह 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामध्ये 2 मे रोजी महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांचा समाधान आवताडे यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये 3 हजार 733 मतांनी पराभव केला होता. त्यांचा आज आमदारकीचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
हेही वाचा - राज्यात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार? मंत्रिमंडळ बैठकीत आज होणार निर्णय