सोलापूर - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरतील किराणा दुकान, दूध विक्रेते, होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल, ई-कॉमर्स तसेच अत्यावश्यक सेवेतील कारखान्यात काम करणारे कामगार या सर्वांकडे रॅपिड अँटिजन टेस्ट अथवा आरटीपीसीआर तपासणी केलेले निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी आदेश काढला.
23 मेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील नागरिकांकडे निगेटिव्ह प्रमाणपत्र गरजेचे
शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिकेच्या तपासणी पथकांमार्फत तपासणी करून घ्यावे, असे आवाहन पालिका आयुक्त यांनी केले आहे. अत्यावश्यक सेवेतील अनेकांकडे वैधता असलेले कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असल्याचे दिसून येत नसल्याचे आढळले असून 23 मे 2021पर्यंत सर्व परवानगी असलेल्या व्यावसायिकांनी तपासणी केलेला कोविड निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्तांनी दिला.
ICMR असलेला संगणकीय छापील प्रमाणपत्र ग्राह्य धरला जाणार
अत्यावश्यक सेवेत व इतर परवानगी असलेल्या दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट नाही अशा व्यवसायिकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त शिवशंकर यांनी दिली. यापुढे सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी अहवाल ICMR नंबर असलेला कम्प्युटर प्रिंटवर देण्यात येईल. यासंबंधी सर्व नागरी आरोग्य केंद्रांना आदेश देण्यात आले आहेत. ज्यांच्याकडे ICMR नंबर असलेला छापील रिपोर्ट आहे तोच ग्राह्य धरला जाईल. महापालिकेच्या नागरिक आरोग्य केंद्रामध्ये हस्तलिखित देण्यात येणाऱ्या कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट ग्राहय धरला जाणार नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.