पंढरपूर - करमाळा तालुक्यात गेल्या बारा दिवसांत बारा जणांचे बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अद्याप यश आलेले नाही. केडगाव शिवारात ऊसतोड मजुराच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलीचा मत्यू झाला. या घटनेपासून ऊसतोड मजूर जीव मुठीत धरून दिवस काढत आहेत. वन विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, शार्प शूटर, गन मॅन असा मोठा लावाजमा कडेगाव, वांगी, सांगवी या परिसरात तयार ठेवण्यात आला आहे. मात्र वनाधिकाऱ्यांना बिबट्याला पकडण्यात यश येताना दिसत नाही. आता या बिबट्याला पकडण्यासाठी जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वतः बॅटरी व काठी घेऊन वनाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी जावून पाहाणी केली.
आमदार रोहित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
आ. रोहित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी उपस्थित वनविभाग अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. आतापर्यंत या बिबट्याने 12 जणांचे जीव घेतले आहेत. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने तातडीने या बिबट्याला जेरबंद करावे, अशा सूचनाही रोहित पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच त्यांनी या परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
करमाळ्यातील सांगवी परिसरात बिबट्याचा वावर
करमाळा तालुक्यात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण कायम असून. सांगवी येथे बिबट्याने मनीषा मोहन पाटील या महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. मात्र पती मोहन पाटील यांनी या बिबट्याचा प्रतिकार केल्याने मोठा अनर्थ टळला. यामुळे परिसरातील गावांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाकडून या बिबट्याचा शोध सुरू असून, अद्याप ते बिबट्याला जेरबंद करू शकलेले नाहीत.