सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेत आला आहे. बऱ्याच खलबतानंतर माढ्याचे उमेदवार जाहीर झाले आहेत. येथून आघाडीकडून राष्ट्रवादीचे संजय शिंदे हे तर युतीकडून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकील्ला समजला जातो. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांच्या जोरावर भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
२०१४ ची परिस्थिती
माढा लोकसभा मतदारसंघ तयार होण्याअगोदर हा पंढरपूर लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. 2008 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर माढा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आणि प्रथमच या मतदारसंघातून 2009 मध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढवली. यामध्ये ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर 2014 च्या मोदी लाटेत या मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील हे 25 हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी महायुतीच्या सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता.
पक्षीय बलाबल
या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आलेले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस (अनूसूचित जातीसाठी राखील), माढा आणि करमाळा (सर्वसाधारण) हे चार विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण ( अनूसूचित जातीसाठी राखीव) हे विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये ३ राष्ट्रवादीचे, १ काँग्रेस, १ शिवसेना तर एका ठिकाणी शेकापचे वर्चस्व आहे.
माढा - बबनरावजी शिंदे (राष्ट्रवादी)
माळशिरस - हनुमंत डोळस (राष्ट्रवादी, मोहिते पाटील समर्थक)
सांगोला - गणपतराव देशमुख (शेकाप)
करमाळा - नारायण पाटील (शिवसेना)
माण-खटाव - जयकुमार गोरे (काँग्रेस)
फलटण - दिपक चव्हाण (राष्ट्रवादी)
मतदारसंघातील प्रश्न
सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघ हा विविधतेने नटलेला आहे. या लोकसभा मतदारसंघात माण-खटाव आणि सांगोल्यासारखे कायम दुष्काळी तालुके आहेत. तर सर्वाधिक साखर कारखाने देखील याच मतदारसंघात आहेत. एका टोकाला कायम दुष्काळ तर दूसरीकडे 115 टीएमसी पाण्याचे उजनी धरण. या सर्व गोष्टीमुळे हा मतदार संघ विविधतेने नटलेला आहे. लोकसभा मतदार संघातील प्रत्येक मतदार संघातील प्रश्न आणि समस्या या वेगवेगळ्या आहेत.
राज्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणातील पाणी हे करमाळा तालुक्यातच मोठ्या प्रमाणावर साठले जाते. मतदारसंघाचा पूर्व आणि मध्य भाग हा उजनी धरणाच्या पाण्याने समृद्ध झालेला आहे. तर तालुक्यातील पश्चिमोत्तर भाग हा कायम पाण्यासाठी तहानलेला आहे. मतदारसंघातील सातारा जिल्ह्यात असलेले माण आणि खटाव हे तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला यासारखे तालुके कायमच दूष्काळी आहेत.
दूसरीकडे उजणी धरणातील पाण्यामूळे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक साखर कारखाने म्हणून या मतदारसंघाची ओळख निर्माण झालेली आहे. माढा मतदारसंघातून भीमा, सीना, माण, नीरा यासारख्या प्रमुख नद्या वाहतात. या नदीकाठावर असलेल्या गावामध्ये विकासाचे अनेक प्रश्न आहेत. तसेच दुष्काळी तालुक्याचे देखील प्रश्न आहेत. कायम दुष्काळी असलेल्या तालुक्यात पाण्याचे अनेक प्रश्न आहेत. कायमच पाण्याचा सुकाळ असलेल्या तालुक्यात जलसंपदा विभागाच्या अर्धवट राहिलेल्या कामांचे प्रश्न आहेत. दुष्काळी भागात उद्योग व्यवसायाचे प्रश्न आहेत. तर आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या तालुक्यामध्ये राजकीय प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे विविधतेने नटलेल्या या माढा लोकसभा मतदार संघातील मतदार, कार्यकर्ते आणि नेते ही विविध अंगी असल्याचे पहायला मिळते.
निवडणुकीच्या तोंडावर अनेकांचा भाजपप्रवेश
माढा लोकसभा मतदार संघामध्ये भाजपाने ऐनवेळी साताऱ्याचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणतिसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. सध्या माढ्यामध्ये भाजपाकडे जे नेते आहेत ते सर्व नेते हे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधून आलेले आहेत. या आयात उमेदवारांच्या भरवशावरच भाजप लोकसभेची निवडणूक जिंकू पाहत आहे. यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेले मोहिते पाटील, पंढरपूरचे कॉंग्रेसचे नेते कल्याण काळे, साताऱ्याचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले रणतिसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपमध्ये प्रवेश देत माढ्यातील उमेदवारी दिली. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील धनगर नेते उत्तम जानकर, माढ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे, कॉंग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे, दादासाहेब साठे, माण-खटावचे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार जयकूमार गोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शेखर गोरे, सांगोल्यातील शहाजीबापू पाटील, पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे श्रीकांत देशमुख, माढ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पाटील भीमानगरकर या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये घेऊन मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे माढ्यातील निवडणुकीची गणित घालत आहेत. या सर्वांमध्ये माळशिरस तालुक्यातील राजकुमार पाटील आणि करमाळ्यातील भाजपचे काही निष्ठावान कार्यकर्ते सोडले तर सर्व नेते हे इतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आयात केलेले नेते आहेत.
शरद पवारांसह मुख्यमंत्री आणि मोहिते पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई
माढ्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण याच मतदारसंघातून खूद्द शरद पवार यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर माघारही घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील बडे प्रस्थ असलेल्या मोहिते पाटील कुटुंबातील रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रवेश केला असला तरी अजून विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र, सध्या ते भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसला धडा शिकविण्यासाठी मोहिते पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. माढ्याचा लोकसभेचा उमेदवार निवडूण आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढ्याची लढाई ही प्रतिष्ठेची केली आहे. मूख्यमंत्र्यांसोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या मोहिते पाटलांसाठी ही माढ्याची लढाई ही प्रतिष्ठेची झालेली आहे. तसेच उमेदवारी जाहीर करुन, त्यानंतर माघारी घेतलेल्या शरद पवारांसाठी देखील माढ्याची निवडणूक ही प्रतिष्ठेची झालेली आहे. त्यामुळे प्रमुख तिघांनी प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे.
मतदारसंख्या -
माढा लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 94 हजार 264 मतदार आहेत. यापैकी 9 लाख 91 हजार 966 पूरूष मतदार आहेत. तर 8 लाख 97 हजार 869 स्त्री मतदार आहेत.
करमाळा - 3 लाख 2 हजार 657
माढा - 3 लाख 21 हजार 897
सांगोला - 2 लाख 89 हजार 766
माळशिरस - 3 लाख 16 हजार 957
फलटण - 3 लाख 26 हजार 492
माण-खटाव - 3 लाख 36 हजार 495
माढा लोकसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 25 मतदान केंद्र आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 10 लाख 77 हजार 966 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी ही 63.71 टक्के होती.
आत्तापर्यंत माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता नेत्यांच्या राजकीय उड्डाणामुळे इथली परिस्थिती, परस्परविरोधी टोकाचे राजकारण याचा फायदा भाजप उचलू पाहत आहे. आता यामध्ये संजय शिंदे बाजी मारणार की रणजितसिंह निंबाळकर राष्ट्रवादीच्या बालेकील्ल्याला सुरुंग लावणार हा येणारा काळच ठरवेल.