पंढरपूर (सोलापूर) - कोरोना रुग्णांच्या संख्येत सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यासह पाच तालुक्यांमध्ये संचारबंदी करण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाकडून घेतला आहे. ही संचारबंदी ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये येत असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून संचारबंदीचा तीव्र विरोध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांनी संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडली होती. व्यापाऱ्यांनी संचारबंदी विरोधात सविनय कायदेभंग आंदोलनचे बंड पुकारले होते. यावर प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढून आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केल्यानंतर व्यापारी महासंघाने आंदोलन माघारी घेतले असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यजित मोहोळकर यांनी दिली.
- पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी उघडली होती दुकाने -
नागपंचमी सणाच्या दिवशी प्रशासनाकडून पंढरपूर शहरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पंढरपुरात व्यापारी महासंघाने शासनाचे नियम डावलून दुकाने उघडण्यास सुरुवात केली होती. पंढरपूर शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या स्टेशन रोड, शिवाजी चौक, घोंगडी गल्ली येथील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडून शासनाचा निषेध व्यक्त केला होता. विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापार्यांनी सकाळच्या सत्रामध्ये दुकाने खुली केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाकडून दुकाने बंद करण्याचे आव्हान केल्यानंतर दुकाने बंद केली आहेत.
- पोलीस प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन -
पंढरपूर शहरातील काही व्यापार्यांनी दुकाने खुली केली होती. व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्या नंतर शहर पोलीस प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करुन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरीक्षक अरुण पवार व पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - सोलापुरात पंढरपूरसह पाच तालुक्यात संचारबंदी, संचारबंदीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध