सोलापूर (करमाळा) - तालुक्यातील अर्जुननगर आणि म्हसेवाडी ही एकत्र ग्रामपंचायत आहे. या ठिकाणचा स्वस्त धान्य दुकानदार हा नियमाप्रमाणे धान्य देत नाही. रेशनकार्डची ऑनलाईन माहिती चेक केली असता त्यावरील माल आणि ग्रामस्थांना दिला जाणारा माल यात तफावत आढळून येत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. या दुकानदाराची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी सरकारने स्वस्त धान्य दुकानातून लोकांसाठी धान्य उपलब्ध करून दिले आहे. मात्र, अर्जुननगर येथील स्वस्तधान्य दुकानदार हा नियमाप्रमाणे धान्य देत नसून जास्त पैसे घेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
स्वस्त धान्य दुकानदार हा नियमाप्रमाणे धान्य देत नाही, जास्त पैसे घेतो याबाबत सर्कल काझी, तलाठी फपाळ, ग्रामसेवक लटके यांच्याकडे ग्रामस्थांनी तोंडी तक्रार केली. त्यांनी स्वस्तधान्य दुकानदार आणि ग्रामस्थांची बैठक घेतली. स्वस्तधान्य दुकानदाराने सर्वांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. ज्यांना कमी धान्य दिले त्यांना राहिलेले धान्य देण्याचेही मान्य केले. मात्र, त्यानंतर दुकानदाराने धान्य दिले नाही. स्वस्त धान्य दुकानाच्या बाहेर धान्याचा तपशील असलेला बोर्ड लावणे बंधनकारक आहे. तो बोर्डही या दुकानदाराने लावलेला नाही.
काहींना नजरचुकीने कमी धान्य दिले गेले असेल. पैसे सुट्टे नसल्याने काहींचे माझ्याकडे पैसे राहिले असतील, याचा अर्थ असा नाही होत की मी भ्रष्टाचार केला, असे मत स्वस्तधान्य दुकानदाराने व्यक्त केले.