सोलापूर - महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने तातडीने कर्ज माफी जाहीर करावी. अभ्यास करतोय, माहिती घेतोय, असे करत बसाल, तर हे सरकार 5 वर्षे टिकणार नाही, असे वक्तव्य शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी केले आहे.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या उद्धव ठाकरे सरकारने तातडीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी जाहीर करावी, अन्यथा येत्या 12 डिसेंबर पासून सरकार विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिला.
हेही वाचा - सोलापुरात कांदा दराच्या फुगवटीवरून शेतकरी संतप्त
शेतकरी कर्जमाफी संदर्भात अभ्यास करतोय, माहिती घेतोय, असे करत बसाल तर सरकार 5 वर्षे टिकणार नाही, अशी टीका पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. येत्या 12 डिसेंबरला आयात धोरणाच्या विरोधात आवाज उठवणारे हुतात्मा बाबू गेणूचा स्मृतीदिन आहे. या दिनापर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी जाहीर करावी. अन्यथा, आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा - हौसेला मोल नसते; शेतकऱ्याने आपल्या नवरी मुलीची हेलिकॉप्टरमधून केली पाठवणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या तडफेने मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रो शेडला स्थगिती दिली. त्याच तडफेने त्यांनी आता शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, असे पाटील यांनी सांगितले.