सोलापूर : भारताचं राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांनी लिहिलं आहे, असे वाक्य अनेकदा इतिहासात वाचायला मिळतं. परंतु सोलापूर शहरात झालेल्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध इतिहासकार सरफराज शेख यांनी भारताच्या राष्ट्रगीताबाबत नवीन माहिती दिली. भारत देशाचं पहिलं राष्ट्रगीत हे अमीर खुसरो यांनी लिहिलं होतं. अमीर खुसरो यांना कवी, शायर, संगीतकार म्हणून ओळखलं जातं.
भारताचं राष्ट्रगीत अमीर खुसरो यांनी लिहिलं : इतिहासात अमीर खुसरो यांचा कार्यकाळ इ.स.1253 ते 1325 मानला जातो. रवींद्रनाथ टागोर यांच्या अगोदर शेकडो वर्षांपूर्वी भारताचं राष्ट्रगीत अमीर खुसरो यांनी लिहिलं होतं, असा दावा सरफराज शेख यांनी केलाय. शनिवारी रात्री जमियत ए उलेमा हिंद तर्फे सद्भावना मंच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम समाजाचं योगदान या विषयावर अनेक तज्ञांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मैसूरचा राजा टिपू सुलतान यावरील गाढे अभ्यासक सरफराज शेख हे देखील या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी इतिहासकार सरफराज शेख यांनी अमीर खुसरोंवर आपलं मत व्यक्त केलं.
टिपू सुलतान राजाविषयी जनजागृतीपर कार्यक्रम : 15 ऑगस्ट रोजी देशभर भारताचा 77 व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. सोलापूर शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. शहरातील भवानी पेठ परिसरात काही तरुणांनी टिपू सुलतान, मौलाना अबुल कलाम व महात्मा गांधी यांच्या प्रतिमा लावून तिरंगा ध्वज फडकविला होता. त्याचवेळी सोलापुरातील जोडभावी पेठ पोलिसांनी ध्वजारोहण कार्यक्रमा दरम्यान टिपू सुलतानची प्रतिमा हस्तगत करून, एका तरुणाला कायदेशीर नोटीस दिली होती. टिपू सुलतानच्या फोटोमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी समज देत तरुणास सोडून दिलं होतं. यावरून सोलापूर शहरात टिपू सुलतानचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्व या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यास सुरुवात झाली. शनिवारी (26 ऑगस्ट) सायंकाळी दयानंद महाविद्यालय शेजारी असलेल्या एका मैदानात 'जमियत ए उलेमा हिंद' या संघटनेच्या वतीनं सद्भावना मंच कार्यक्रम संपन्न झाला.
चुकीचा इतिहास सांगितला जातो : भारत देशात अनेक मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास चुकीचा सांगितला जातो, असं सरफराज यांनी आपल्या भाषणातून सांगितलं. 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा' हे गीत लिहिणारे डॉ. इकबाल भारत-पाक फाळणीच्या वेळी पाकिस्तान देशात गेले. "मी आणि आमचा बाप" या पुस्तकाचे लेखक डॉ. नरेंद्र जाधव यांनी असा इतिहास लिहिला आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, डॉ. इकबाल यांचा मृत्यू पाक निर्मिती किंवा भारत-पाक फाळणी होण्याअगोदर भारतातच झाला होता. तर मग मृत्यूनंतर ते पाकिस्तानात गेले कसे? असा सवाल इतिहासकार सरफराज यांनी उपस्थित केला.
हेही वाचा -