सोलापूर (माढा) - माढा तालुक्यातील सुलतानपूर गावच्या गायरान जागेत सीना नदीमधील वाळचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला आहे. याठिकाणावरून वाळूची तस्करी होत आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी बाबासाहेब भोसले या नागरिकांने केली आहे. याबाबत त्यांनी पुण्याच्या महसुल आयुक्तांना निवेदनही दिले आहे.
काय आहे प्रकरण -
सुलतानपूर गावाजवळून सीना नदी वाहत असल्याने वाळू उपलब्ध आहे. सुलतानपुरातील गायरान जागेवर काटेरी झुडपात वाळूचे मोठे-मोठे साठे केलेले आहेत. शासकीय गायरान जमीन मोकळी असल्याने गावातील व परिसरातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सीना नदीमधील हजारो ब्रास वाळूचे साठे केले आहेत. पावसाळ्यात या वाळूची अवैधपणे विक्री केली जाते. या कल्पना प्रशासनाला असून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे बाबासाहेब भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे. एक गुप्त पथक पाठवून हा वाळूचा साठा जप्त करावा व संबधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भोसले यांनी केली आहे. निवेदनासोबतच गावातील गायरान जागेचा उतारा देखील देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, कुर्डूवाडीच्या प्रांताधिकारी यांना देखील या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत - प्रांताधिकारी
सुलतानपूरमधील वाळूबाबत माझ्याकडे तक्रार आली आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. माढा तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे माढ्याच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.