सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांची दारे अद्यापही उघडली नसल्याच्या घटना वारंवार पुढे येत आहेत. रुग्णालयांच्या या मनमानी कारभाराविरोधात एका रुग्णाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मोडनिंब गावातील एका माजी सैनिकावर सोलापुरात कोणतेही रुग्णालय उपचार करत नसल्याने माजी सैनिकाने रोष व्यक्त केला. देशासाठी लढलो, शांती सेनेत दोन देशात गेलो. देशासाठी आणखी काय करायला पाहिजे? असा टाहो या सैनिकाने फोडला आहे.
बाळासाहेब जनार्धन डावरे, असे या माजी सैनिकाचे नाव आहे. यांनी सैन्यात राहून देशसेवा केली आहे. ते सैन्यात सुभेदार या पदावर होते. पाकिस्तानच्या सीमेवर अवघ्या 70 फुटावरून पाकिस्तानसोबत यांनी दोन हात केले आहेत. शांती सेनेत ते बांग्लादेश आणि भूटानमध्ये देखील गेले आहेत. माजी सैनिक असलेले बाळासाहेब डावरे हे सध्या आजारी आहेत. ते डायलिसिसवर आहेत.
डावरे उपचारासाठी सोलापुरात असता, सुरुवातीला सोलापुरातील एका रुग्णालयामध्ये गेले त्यावेळी त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितले. त्या ठिकाणाहून आणखी तिसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले, असे करत त्यांनी सोलापुरातील 4 ते 5 रुग्णालये फिरून देखील त्यांच्यावर कोणीही उपचार करायला तयार नाही. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी यापूर्वीच आदेश दिले आहेत. मात्र, कोणतेही डॉक्टर उपचार करत नसल्याने डावरेंनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी त्यांची कैफियत जिल्हाधिकारी समोर मांडली.
दरम्यान, वारंवार जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णांना उपाचार देण्याचे आदेश देऊनही डॉक्टर उपाचार करत नसल्याचे डावरे यांच्या प्रकरणावरुन समोर आले आहे. त्यामुळेच संतप्त झालेल्या बाळासाहेब डावरे यांनी प्रश्न उपस्थित करत देशासाठी आम्ही आणखीन काय करायला पाहिजे होते? असा सवाल प्रशासनाला विचारला आहे.