पंढरपूर - राज्य सरकार जुलमी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 15 लाख वीजपुरवठा खंडित करण्याचे काम चालू आहे. त्याचा प्रत्यय पंढरपूर तालुक्यातील चळे गावापासून सुरू होत आहे. चळे गावातील वीज डीपी खाली उतरवले आहे. त्यामुळे भाजपाकडून चळे गावातून आंदोलनाची सुरूवात केल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी चळे गावात दिली. चळे ग्रामस्थांसह प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. दरेकर यांनी ग्रामस्थांसह राज्य सरकार विरोधात आंदोलन केले.
'प्रत्येक गाव अंधारात ठेवण्याचे काम'
शेतकरी 8 तास वीज वापरतो, त्याला बिल 24 तासाचे दिले जाते. त्यातून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज नाही. घरगुती वीज बिल वापरून भरमसाठ बिल दिले आहे. राज्यातील प्रत्येक गाव अंधारात ठेवण्याचे काम राज्य सरकार करते आहे, असा आरोप दरेकर यांनी केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करू नये.
'आम्हाला अटक करा'
कर्मचाऱ्यांमार्फत शेतकरी व गरिबांवर दबाव आणण्याचे काम राज्य सरकार करत असेल. तर ते खपवून घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांना अटक करण्यापेक्षा आम्हाला अटक करा, शेतकऱ्यांची वीज खंडित करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
'वीज वसुलीबाबत राज्य सरकार जुलमी सरकार'
वीज वसुलीसंदर्भात राज्य सरकारचे कोणत्या पद्धतीने काम सुरू आहे. हे राज्य सरकार जुलमी सरकार आहे. राज्य सरकार आता कारखान्यांच्या माध्यमातून वीज वसुलीची सक्ती करत आहे. आता तर महिला कर्मचाऱ्यांकडून वीजबिल वसूल केले जाणार आहे. जर असे झाले तर शेतकऱ्यांनी विरोध केला त्या शेतकऱ्यांविरुद्ध विनयभंगाची केस या सरकारकडून केली जाणार आहे. अशा प्रकारचे नियोजन राज्य सरकार करत असल्याची माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य सरकार चालू आहे, त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा कट आहे, असा आरोप त्यांनी केला.