पंढरपूर - पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ही निवडणूक निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
मतदारसंघात 524 मतदान केंद्र -
कोरोना प्रादुर्भावामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रशासनाकडून मतदार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. यामध्ये पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात 524 मतदान केंद्र असणार आहे. यामध्ये 328 मूळ मतदान केंद्र तर 196 सहाय्यक मतदान केंद्र म्हणून उभारण्यात आली आहे. मतदान केंद्रासाठी 524 कंट्रोल युनिट, 1028 बॅलेट युनिट, 524 व्हीव्ही पॅट मशीन असणार आहेत. 210 कंट्रोल युनिट 420 बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात आले आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेत सुमारे तीन लाख 40 हजार आठशे 89 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये एक लाख 78 हजार पुरुष मतदार आहेत तर 1 लाख 62 हजार स्त्रिया मतदारांची नोंद आहे. कोरोना महामारीमुळे पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणुकीसाठी 2,552 अधिकारी नियुक्त -
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मतदान कामासाठी 2,500 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कर्मचारी व मतदान साहित्य वाहतुकीसाठी 94 एसटी बसेस व 3 जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य दक्षता -
राज्यात कोरोना माहामारीमुळे 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र त्यातून पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी सूट देण्यात आली आहे. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी राज्य शासनाकडून सवलत देण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. हे मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, मास्क इत्यादी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती गजानन गुरव यांनी दिली.