सोलापूर- मतदानाचा हक्क बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मात्र काहीजण हे कर्तव्य न बजावता त्या दिवसाचा वेळ इतर कामासांठी वापरतात. अशा नागरिकांनी विद्या खुळे यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. विद्या खुळे या नऊ महिन्यांच्या गर्भवती असतानाही त्यांनी मतदान केले. मतदानाच्या अर्ध्या तासानंतर त्यांना कन्यारत्न झाले.
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर या गावातील विद्या ज्ञानेश्वर खूळे या नऊ महिन्याच्या गर्भवती होत्या. बाळंतपणाचे दिवस पूर्ण झालेले असताना देखील विद्या खुळे यांनी मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्णय घेतला. खुळे दाम्पत्याने श्रीपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी ११ वाजता मतदान केले. मतदान केल्यानंतर विद्या खुळे यांना पोटात कळा यायला सुरूवात झाली. यावेळी पती ज्ञानेश्वर खुळे यांनी विलंब न करता जवळच्याच खासगी रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयात दाखल केल्यानंतर सकाळी ११:३० वाजता त्यांना कन्यारत्न झाले.
विद्या खुळे या गृहिणी आहेत. विद्या यांचे पती ज्ञानेश्वर खुळे हे श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात लिपिक या पदावर कार्यरत आहेत. अवघडलेल्या अवस्थेत असताना सुद्धा या पती-पत्नीने लोकशाहीने दिलेला मतदानाचा पवित्र अधिकार प्रथम बजावला त्यामुळे श्रीपुर आणि परिसरांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
श्रीपुर परिसरांमध्ये रोटरी क्लब श्रीपुर व श्रीपुर प्रेस क्लबच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बॅनर लावून जनजागृती करण्यात आली होती. तेच ध्यानात ठेवून आम्ही प्रथम मतदानाच्या हक्काला प्राधान्य दिले असल्याचे विद्या खुळे आणि ज्ञानेश्वर खुळे यांनी सांगितले.