पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे माढा तालुक्यातील सुमारे 82 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सध्याचे तालुक्याचे राजकीय चित्र पाहता सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. असे असताना राज्यपातळीवरचा महाविकास आघाडीचा धर्म म्हणून राष्ट्रवादी काँंग्रेस शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेसला सोबत घेवून या निवडणुका लढवणार का? यावरुन तालुक्यात चर्चा रंगताना दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने माढा तालुक्यातील राजकीय लेखा-जोखा घेणारा हा विशेष वृत्तांत..
तालुक्यात आमदार शिंदे बंधू व मोहिते-पाटील गटाची लागणार कसोटी-
माढा तालुक्यातील सुमारे 82 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे याच निवडणुकांमधून महाविकास आघाडी की पक्षपुरस्कृत पॅनेल बनवून स्वतंत्र निवडणूका याचे उत्तर मिळणार आहे. सद्य स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाबल तालुक्यात सर्वाधिक असले, तरी माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार बबन दादा शिंदे यांची 25 वर्षापासून निर्विवाद सत्ता आहे. त्यांचे बंधू करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांचा माढा तालुक्यावर मोठा प्रभाव आहे. तर मोहिते-पाटील गटामुळे भाजपाचे वर्चस्व आहे. तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचीही या तालुक्यात ताकद वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असाच जोरदार सामना या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. तथापी, महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांना सोबत घेतल्यास निश्चितच भाजपपुढे अतिशय तगडे आव्हान उभे राहणार आहे. पण उमेदवारीत मोठी चढाओढ निर्माण होईल. त्यामुळे आगामी निवडणुका दुरंगी, तिरंगी की चौरंगी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये माढा तालुक्याच्या दुष्काळी भाग म्हणून ओळख पुसण्यात यश आले आहे. त्यात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा विकास झाला. अनेक वर्षांपासून कागदावरच असलेला भीमा-सीना-माढा हा प्रकल्प मार्गी लावण्यात येथील लोकप्रतिनिधींना यश आले आहे. यामुळे ऊस लागवड तसेच फळ बागायत क्षेत्रात विकास झाल्यामुळे तालुक्याच्या आर्थिक स्थिती चांगली झाली. त्यात तालुक्यात तीन साखर कारखान्यांची भर पडली. यामुळे माढा तालुक्याच्या राजकारणात साखर कारखानदारांचा मोठा प्रभाव जाणवतो आणि त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ग्रामपंचायतींवर प्रभाव पडताना दिसून येतो.
बिनविरोध ग्रामपंचायतींना मिळणार आर्थिक आधार
माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायत मधून काही ग्रामपंचायत सदस्यांनी बिनविरोध ग्रामपंचायत निवडण्याचा निर्धार केला आहे. त्यात तालुक्यातील मोडनिंब याा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली, तर मोडनिंब रोटरी क्लब च्या वतीने एक लाख अकरा हजार रुपयांचे विकास निधी देण्याची घोषणा करण्याात आली. त्याच पद्धतीने राज्य शासन, विविध संस्था, संघटनांनी तालुक्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना विकास देण्याचे संकल्प केला आहे.
पोलीस प्रशासनाकडून जनजागृती
माढा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्याअनुषंगाने गावोगावी नेतेमंडळींची चाचपणी सुरू आहे. परंतु माढा पोलीस ठाण्याच्या वतीने या निवडणुका बिनविरोध कराव्यात असे आव्हान करण्यात येत असून, त्याअनुषंगाने बैठक घेऊन आव्हान केले जात आहे. नागरिकांचा देखील या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. आतापर्यंत तांदुळवाडी, धानोरे, कापसेवाडी या गावात बैठका घेण्यात आल्या आहेत.
भाऊबंदकी मधील वातावरण तापले
सरपंच पदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतर काढण्याचे निवडणूक आयोगाने ठरवले असल्यामुळे तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये चुरस निर्माण झाली आहे. 23 डिसेंबरला नामानिदर्शन पत्र दाखल करण्यात सुरुवात झाली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये इच्छुक भाऊ बंदुकीची गर्दी झाली आहे. तर 4 जानेवारी उमेदवारी मागे घेण्याची शेवटची संधी आहे. त्यानंतर तालुक्यात किती पॅनल असतील याचे चित्र स्पष्ट होणार आहे.