सोलापूर - विधिमंडळ लॉबीतल्या मिश्किल राजकीय गप्पांमुळे महाराष्ट्रात सर्वश्रुत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या पक्षांतराची चर्चा घडवून स्वतःच्या बार्शी विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय राजकीय विरोधकांची चांगलीच कोंडी केली. सोपल शिवसेनेत जायच्या तयारीत असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. मात्र, स्वतः सोपलांनी आपला पक्ष कोणता जाहीर न करता त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे आणि भाऊसाहेब आंधळकर यांची दांडी गुल केली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे निरीक्षक अजित पवार यांनी नुकत्याचं सोलापुरात राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या मुलाखतीला शरद पवारनिष्ठ म्हणून ओळख असलेले सोपल गैरहजर राहिले. मात्र, राष्ट्रवादीकडे इच्छुक असल्याचा अर्ज पाठवून दिला. तेंव्हा अजित पवारांनी सोपल राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याचा खुलासाही केला होता. बार्शीतल्या त्यांच्या समर्थकांनी सोपल राष्ट्रवादीला 'जय महाराष्ट्र' करणार अशा संदर्भातल्या पोस्ट व्हायरल केल्या. त्यामुळे त्यांचे विरोधक बुचकळ्यात पडले आहेत. कारण, सोपल कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेतात यांवरच विरोधकांची गणिते अवलंबून आहेत.
सोपलांविरोधात सेनेचा आमदार राहिलेल्या राजेंद्र राऊत यांचा प्रवास व्हाया राणे समर्थक काँग्रेस आता भाजप असा झालेला आहे. मात्र, युती झाली तर बार्शीची जागा सेनेला सुटणार आहे. त्यामुळे राऊतांची जागा चुकणार आहे. अन युती नाही झाली तर भाजपची उमेदवारी राऊतांना मिळेलेही पण मूळ भाजपनिष्ठ अन 15 हजार मतांचे दावेदार राजेंद्र मिरगणे मदत करतील का? याचे उत्तर कुणाकडे नाही. दुसरीकडे राऊत यांना मिळालेल्या धड्यावरून भाऊसाहेब आंधळकर यांना सोपलांचे काम करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून शेवटी सोपल बाजी मारतील असे आताचे चित्र आहे.
त्यातच सोपलांनी कार्यकर्त्यांचे दोन निर्धार मेळावे घेऊन कार्यकर्त्यांचा कल घेतलाय. त्यावरून ते सेनेत जातील असा अंदाज बांधला जात आहे. त्याची अधिकृत घोषणा न करता युती होणार की नाही यावर अडकलेले सोपल सावध प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळं अजूनही कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय... सांगा सोपल नेमके कोणाचे ?