सोलापूर - एका गुन्ह्यातील आरोपी पकडण्यासाठी जिंती परिसरात गेलेले असताना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रामवाडी भागातील भीमा नदीपात्रातील वाळू उपशावर छापा टाकला. त्याठिकाणी दोन यांत्रिक व दोन साध्या बोटींसह एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मध्यरात्री दोनच्या सुमारास रेल्वे पुलाजवळ रामवाडी येथे करण्यात आली. तहसीलदार यांनी सर्व पंचनामा करुन बोटींसह १६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. तर, पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - पहेले मंदिर फिर सरकार; उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील - खासदार राहुल शेवाळे
मनारुल अब्दुलवादुत शेख (रा. पलारागच्छी, ता. उदवा जि. साहेबगंज, झारखंड) याला ताब्यात घेतले आहे. तर, त्याने दिलेल्या माहितीवरुन, शेखर फाळके (रा. सिद्धटेक) व लालासाहेब काटकर (रा. शिरापूर, दौंड) यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिरोज आत्तार यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की एका गुन्ह्यातील आरोपी पकडण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, हवालदार बजरंग बोराटे, फिरोज आतार, समीर खैरे व रविराज नागरगोजे हे जिंती परिसरात शोध घेत होते. यावेळी करमाळा पोलीस ठाणे येथून पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना रामवाडी परिसरात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जाधव यांच्या पथकाने रामवाडी येथे रेल्वेच्या पुलाजवळ रात्री दोनच्या सुमारास खासगी बोटीच्या साह्याने पोहोचले. त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना पाहून इतर सर्व पळून गेले. पण, एक व्यक्ती पोलिसांच्या हाती लागला. त्याठिकाणी दोन यांत्रिक बोटी व दोन मालवाहतूक बोटी होत्या. त्यामध्ये सोळा ब्रास वाळू आढळून आली. त्यावेळी पकडण्यात आलेल्या आरोपीस इतर आरोपींबद्दल माहिती विचारली असता, एक बोट अहमदनगर जिल्ह्यातील शेखर फडके तर दुसरी बोट पुणे जिल्ह्यातील लालासाहेब काटकर यांची असल्याची त्याने माहिती दिली.
त्यानंतर तहसीलदार समीर माने यांच्यासह काझी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बोटीचा व वाळूचा पंचनामा करून बोटी नष्ट केल्या व वाळू पाण्यात बुडवून टाकली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव हे करत आहेत.