सोलापूर - माढा शहरात तीन ठिकाणी घडलेल्या दरोडा प्रकरणातील पहिल्या आरोपीचा शोध लावण्यात माढा पोलिसांना २८ दिवसांनी यश आले आहे. गणेश भारत शिंदे (रा. माढा) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. माढा पोलिसांचे पथक अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलीस उप अधीक्षक डॉ. सिध्देश्वर भोरे यांनी गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्याला भेट देऊन गणेश शिंदे याची चौकशी केली. २२ जानेवारी रोजी पहाटे तीन ते चारच्या सुमारास शहरातील मंगळवार पेठेतील कुमार चवरे, रोकडोबा मंदिरासमोरील मिटू वाघ, तसेच सराफ पेठेतील विठ्ठल कासार यांचे दुकान अशा तीन ठिकाणी दरोडा पडला होता. यात एकूण ५ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास झाला. या घटनेसह शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे माढा शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण होते.
हेही वाचा - उपरा'कार लक्ष्मण माने १२ एप्रिलला करणार राष्ट्रवादीत प्रवेश
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उप अधीक्षक डॉ. सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी तपासाच्या दृष्टीने पथक तैनात केले होते. या पथकाला माहिती मिळताच पथकातील पोलीस उपनिरीक्षक किरण घोगडे, मोहम्मद शेख, अजित वरपे, सहदेव देवकर यासह अन्य पथकातील पोलिसांनी सापळा रचून १९ तारखेला रात्री आठच्या सुमारास गणेश शिंदेला अटक केली. रणदिवे गावच्या परिसरातून त्याला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी गणेश शिंदे यांची चौकशी केली असता त्याने अन्य आरोपींसह गुन्हा केल्याचा कबुली जबाब दिला आहे. माढा पोलिसांचे पथक अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - सांगोल्याचे एक लिटरही पाणी कमी होऊ देणार नाही, आमदार शहाजी पाटलांचा शब्द