सोलापूर- आषाढी एकादशीला सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात आज माळीनगर येथे उभे रिंगण पार पडले. वारीतील रिंगण भक्तीची ऊर्जा प्रदान करते,अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रिंगण सोहळा म्हटले की वारकरी आनंदी होतो. कारण तीनशेच्या घरात असलेल्या प्रत्येक दिंडीतला पताकाधारी, विणेकरी, पखवाज-टाळकरी आणि तुलसी वृंदावनधारी महिला आप-आपल्या दिंड्या सोडून भेदा-भेदाच्या पलीकडे रिंगणात येऊन धावा करतात. त्यात भक्तीच्या पलीकडे कुठलाच लवलेश नसतो.
चैतन्य आणि आनंददायी वातावरणात पालखीसोहळ्यात आज उभे रिंगण पार पडले. रविवारी अकलूज येथे गोल रिंगण पार पडले होते.
अडीचशे किलोमीटरचे अंतर ऊन, वारा,पाऊस झेलत आम्ही पार करतो. मात्र, या प्रवासात कुठेही थकवा जाणवत नाही याचे कारण रिंगण सोहळा आहे, असे वारकऱ्यांनी सांगितले.