सोलापूर - जागतिक महामारी असलेल्या कोरोनामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-विदेशातील वारकऱ्यांची यावर्षीची पारंपरिक आषाढी वारी चुकणार आहे. त्यामुळं या वारकऱ्यांनी वृक्षलागवड करून त्यात विठ्ठल पहावा असं आवाहन सिने अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केलं आहे. सध्या शिंदे पालखी मार्गावर फिरून वृक्षारोपणाचं महत्व सर्वांना सांगत आहेत. आज त्यांनी वेळापूर येथील पालखी तळाला भेट दिली त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं.
सह्याद्री देवराई संस्था, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्र देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावरील तळावर सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ शिवाजी मोरे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे अध्यक्ष ॲड. विकास ढगे-पाटील, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे, सोहळा प्रमुख अजित मोरे यांच्यासह गावोगावचे सरपंच , ग्रामसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावर्षी कोरोनामुळे वारकऱ्यांना आषाढी वारीला येता येणार नाही, याचं दु:ख आहे. हे दु:ख विसरायचं असेल तर जो वृक्ष आपणाला जगण्याची उर्जा देतो. त्याची आपल्या दारात, शेतात, गावात लागवड करुन त्याचीचं पांडुरंग परमात्मा म्हणून पूजा करा. जसे रोज तुळशीला पाणी घालता तसे त्या वृक्षाला घाला. तो तुम्हाला आयुष्यभर जगण्याची उर्जा देइल. या वारीची आठवण म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे....वनचरे या संत वचनाप्रमाणे राज्यातील प्रत्येक वारकऱ्यांनी आषाढी एकादशी दिवशी सकाळी ११ वाजता आपल्या घरासमोर विठ्ठलरुपी वृक्षाची लागवड करुन विठ्ठल दर्शनाचा लाभ घ्यावा. झाडे लावताना वड, पिंपळ, लिंब, चिंच, उंबर, आंबा, आवळा, जांभूळ याच देशी झाडांची लागवड करा असं आवाहनही शिंदे यांनी केलं आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत नामदेव, माता रुक्मिणी, संत चांगावटेश्वर आदी संतांच्या माध्यमातून राज्यभरातून येणाऱ्या सुमारे १५ लाख वारकऱ्यांनी आपापल्या गावी १५ लाख झाडे लावण्याचा विठ्ठल चरणी संकल्प केला असल्याचे हरीतवारीचे प्रणेते आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ शिवाजी मोरे यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ४५० दिंड्या आहेत. या दिंडीतील वारकऱ्यांनी आपल्या गावी तर पालखी मुक्कामाच्या गावात पालखी तळावर वृक्ष लागवड करावी असे आवाहन ॲड. विकास ढगे-पाटील यांनी केले. तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ३२९ दिंड्या आहेत. या दिंडीकऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी संपर्क केला आहे. प्रत्येक दिंडी प्रमुखांनी एकादशी दिवशीच वृक्ष लागवड करावी, असे आवाहन अध्यक्ष मधूकर मोरे यांनी केले.