सोलापूर - पावणे दोन वर्षातच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर करण्यात आलेल्या वज्रलेपाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्री रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेपाचे तुकडे निघत असल्याने पायाच्या भागाची झीज झाली आहे. ही झीज कशामुळे झाली आहे? श्री विठ्ठलाच्या मूर्तीची नेमकी परिस्थिती कशी आहे? याची सर्व सखोल तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनीही या वृत्तास दुजोरा दिला असून, या संदर्भात पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधणार असल्याचे सांगितले.
आजतागायत मूर्तींना चार वेळा रासायनिक लेप केला आहे - श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर पूर्वी पंचामृताचा अभिषेक केला जात होता. शिवाय गाभाऱ्यातील तापमान, भाविकांची गर्दी, थेट लाखो भाविकांचा स्पर्श यामुळे मूर्तीची झीज होत आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनंतर पंचामृताचा अभिषेक बंद करण्यात आला. आजतागायत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींना चार वेळा रासायनिक लेप करण्यात आला आहे.
पंढरपूर मंदिर समितीसमोर नवे आवाहन - कोरोना काळात मंदिर बंद असल्याने जुलै २०२० मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाने श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर आणि रुक्मिणी मातेच्या पायावर सिलिकॉनचा लेप दिला होता. हा लेप पुढील ७ ते ८ वर्षे टिकून राहील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. परंतु दोन वर्षांतच रुक्मिणीच्या पायावरील लेपनाचे तुकडे निघत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंदिर समितीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असून देवाचे मूळ रूप पाहता यावे यासाठी वारकरी संप्रदाय आग्रही असतो.