सोलापूर - आपल्या देशात पारंपारिक सण व उत्सवांना अनन्यसाधारण महत्व आहे. शहरीकरणाचा परिणाम म्हणून पारंपारिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या सणांचे स्वरूप बदलले आहे. तर गेल्या सात महिन्यांपासून कोरोना आजाराने सोलापुरातील जनतेला हैराण केले आहे. कित्येक जणांचा बळी कोरोनाने घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली. या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र, बरे झालेल्या लोकांची फुफुसे अशक्त झाली आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी बरे झालेल्या लोकांसह इतरांनाही घातक ठरू नये आणि फटाक्यांच्या भयानक धुराने व वासाने यांचे बळी जाऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता -
सोलापूर शहर व जिल्ह्यात दिवाळी सणाच्या खरेदीसाठी एकच लगबग दिसून येत आहे. बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. कोरोनाच्या भीतीला बाजूला सारून अनेकजण बिनधास्तपणे वावरू लागले आहेत. पण कोरोना विषाणूची दुसरी लाट येऊ शकते, असा अंदाज तज्ञ वर्तवत आहेत. अनेक युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लावले गेले आहे. दरम्यान, दिवाळीत ही लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी सण-उत्सव साजरे करताना काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी फटाकेमुक्त दिवाळीला भर द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले आहे.
दिवाळीत ध्वनी प्रदुषणात होते वाढ -
दिवाळीत फटाक्यामुळे 130 ते 150 डेसीबलपर्यंत ध्वनी प्रदुषण होते. तर, फटाक्याच्या धुरामुळे वायू प्रदुषणातही भर पडते. फटाके फोडणाऱ्यांना क्षणिक आनंद मिळतो. मात्र, या रक्तदाब, मानसिक ताण, निद्रानाश या आजारांनी ग्रस्त असलेल्यांना या प्रदुषणाचा प्रचंड त्रास होतो. आजारी व्यक्ती, वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला यांना प्रदुषणाचा सर्वाधिक धोका असतो. वसुंधरेला ग्लोबल वॉर्मिंगच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला फटाके मुक्त दिवाळी साजरी करणे गरजेचे आहे. तसेच पर्यावरण पूरक व पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करणे महत्वाचे आहे. दिवाळी साजरी करताना उधळपट्टी करत वैचारिक दिवाळखोरी नको.
सोलापुरात सजल्या बाजारपेठा -
शहरातील मुख्य चौकात आकाश कंदिल, पणत्या, दिवे यांचे स्टॉल लागले आहेत. यामध्ये सात रस्ता परिसर, गांधी नगर, लक्ष्मी मार्केट,नवी पेठ, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, कोंतम चौक, नीलम नगर आदी भागांत दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. प्रशासनाने कोणत्याही फटाके विक्रीला सार्वजनिक परवानगी दिली नाही. पण कायमस्वरूपी असलेल्या दुकानांत फटाके विक्रीस परवानगी आहे. महाराष्ट्र राज्याने इतर राज्याप्रमाणे फटाके विक्रीवर बंदी आणली नाही.
शहरात पर्यावरणप्रेमींकडून जनजागृती -
शहरातील पर्यावरण प्रेमी फटाकेमुक्त दिवाळीसाठी जनजागृती करू लागले आहेत. कोरोनातून अनेक रुग्ण अद्यापही सावरले नाहीत, त्यांच्या फुफूसांवर दुष्परिणाम होईल, त्यामुळे किमान यावर्षी तरी फटाके फोडू नका, असे आवाहन केले जात आहे. पर्यावरणपूरक दिवाळीसाठी बाजारात आकाश कंदिल, दिवे ,पणत्या, कागदी हार असे अनेक साहित्य उपलब्ध आहेत.