सोलापूर - शासनाच्या आदिवासी विभागाच्या खावटी योजनेचा पारधी समाज बांधवांना लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांनी केली आहे. याबाबत माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदिवासी विकास मंत्री के. सी.पाडवी यांना निवेदन पाठविले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या महिन्याहून अधिक काळापासून समाजातील हातावरचे पोट असणारे घटक अडचणीत सापडले असल्याचे त्यांनी सांगितले.
अगोदरच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या पारधी समाजावर संकट कोसळून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची परिस्थिती आहे. बहुतांशी पारधी समाजातील कुटुंब ही भूमीहीन असून शेतमजूर आहेत. त्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे सद्यस्थितीत मोठ्या कठीण काळाचा ते सामना करत आहेत. त्यामुळे, या समाजाला आधार म्हणून खावटी योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे, असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.
अनुसुचित जमातीमधील आदिम जमातीला आदिवासी विकास महामंडळाकडून खावटी वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच भटकंती करणारा समाज असलेल्या पारधी समाजाची अडचणही दूर करण्याची मागणी माने यांनी केली. गरज ओळखून सोलापूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील पारधी समाज बांधवांना किमान तीन महिन्यासाठी खावटी योजनेचा विनामुल्य लाभ दिला जावा. असेही माने यांनी म्हटले आहे