पंढरपूर (सोलापूर) - एखाद्या प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची जर प्रशासकीय बदली झाल्यानंतर त्या भागातील नागरिक रस्त्यावर उतरून अधिकाऱ्याची बदली रद्द व्हावी, म्हणून आंदोलन, उपोषण करताना आपण पाहिले आहे. मात्र, पंढरपूरमध्ये महिला अधिकार्याची बदली झाल्यानंतर काही संघटनांनी विठ्ठल मंदिराच्या परिसरात जवळ पेढे वाटून या बदलीचा आनंद साजरा केला. पंढरपूर येथील महिला तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या बदलीनंतर पंढरपुरात पेढे वाटण्यात आले. पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बदली पुणे जिल्ह्यातील खेड या तहसील कार्यालयात झाली आहे. त्यांच्या जागी चंद्रपूर येथून निलेश गोंडे हे बदलून आले आहे.
वैशाली वाघमारे यांच्या कामावर नाराजगी -
वैशाली वाघमारे यांनी तहसीलदार म्हणून एका वर्षापूर्वी पंढरपूर कारभार हाती घेतला होता. त्यांची कामाची पद्धत मात्र सामान्याच्या हिताची वाटत नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांच्या कारभाराविषयी नाराज होती. सर्वसामान्य गोरगरिबांना रेशन कार्ड असेल किंवा शेतकऱ्यांना पूर अनुदान, अवकाळी अनुदान या बाबतीत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी पंढरपूर तहसील कार्यालय मध्ये होत्या. पंढरपूरमध्ये महसूल विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे अवैधरित्या वाळू जोरात चालू होत होती. याबाबत विविध संघटनांनी तक्रारी देऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. या तहसीलदार वाघमारे यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यांच्या कामाविषयी वरिष्ठांकडे लेखी आणि तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी बदलीची मागणी केली होती.
हेही वाचा - 'ऑनालइन बुकींग' करुनच भाविकांनी साईंच्या दर्शनास यावे, संस्थानचे आवाहन
विविध संघटनांकडून पेढे वाटून आनंद साजरा -
वाघमारे यांच्या बदलीनंतर बळीराजा शेतकरी संघटना आणि कोळी महासंघाच्यावतीने हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीजवळ पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.