सोलापूर - पंढरपूर शहर पोलिसांनी १० घरफोड्यांच्या गुन्ह्यातील ५ जणांना अटक केली. मात्र, त्यांचा म्होरक्या हा केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळ (सीबीएसई)चा विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून जवळपास १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सागर बंदपट्टे, असे त्या म्होरक्याचे नाव आहे. त्याच्यासह निलेश भोसले, शोएब नदाफ, अविनाश वाघमारे आणि मुन्ना मागाडे यांना देखील अटक करण्यात आली आहे. म्होरक्या सागरचे सीबीएसईमधून १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यानंतर त्याचा रेकॉर्डवरील नदाफ आणि भोसले यांच्याशी संपर्क झाला. पुढे संपूर्ण टोळीने संगनमत करून कारचा वापर करून पंढरपूर शहरात घरफोड्या करत होती. त्यामुळे या गुन्हेगारांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. केवळ एका लॅपटॉपमुळे त्यांचे बिंग फुटले आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आतापर्यंत 20 तोळे सोने, एक किलो चांदी, एक लॅपटॉप, कॅनन कॅमेरा आणि कारसह १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हे वाचलं का? - थरारक... शेकडोंच्या डोळ्यादेखत एका प्रेमाचा करुण अंत
पोलीस सर्वांची कसून चौकशी करत असून टोळीतील अन्य सदस्यांचा देखील शोध घेत आहेत, असे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले.