सोलापूर - ऑनलाईन वेबसाईटवर मुलगी पाहून लग्नासाठी आलेल्या व्यक्तीला लुटून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना माढा तालुक्यातील भोगेवाडी येथे घडली.
उस्मानाबाद येथील रहिवाशी अहमद शेख (वय ५२) यांनी ऑनलाईन वेबसाईटवर लग्नासाठी भोगेवाडी येथील मुलगी पाहिली. त्यांना ती मुलगी पसंत पडली आणि ते मागील तीन-चार दिवसांपासून मुलीकडच्या लोकांशी मोबाईलवरुन संपर्कात होते. त्यांनी लग्न करण्याच्या उद्देशाने आपले मित्र राजेंद्र पेठे यांच्यासह लग्नासाठी सोने खरेदी करुन भोगेवाडी येथे कारने निघाले.
दोघेही कुर्डुवाडी येथे आल्यानंतर मुलीकडच्या लोकांनी त्यांना तुमची कार गावाकडे जाणार नाही, असे सांगत गावी जाण्यासाठी मोटारसायकलवर जावं लागेल, अशी बतावणी केली. दोघेही मुलीकडच्या लोकांच्या मोटारसायकलीवर बसले. भोगेवाडी परिसरातील माळरानावर आणून त्या लोकांनी अहमद आणि राजेंद्र यांना मारहाण करत त्यांच्याकडील सोने व पैसे काढून घेतले.
मारहाणीत अहमदचा मृत्यू झाला. तर राजेंद्रला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, ही घटना पोलिसांना कळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - करमाळा : साडे ग्रामपंचायतीमध्ये गटारीतील घाण टाकून ग्रामस्थांचे आंदोलन
हेही वाचा - हौसेला मोल नसते; शेतकऱ्याने आपल्या नवरी मुलीची हेलिकॉप्टरमधून केली पाठवणी