पंढरपूर (सोलापूर) - रयत क्रांती शेतकरी संघटनेसह विरोधी पक्षाच्या वतीने पंढरपूर प्रांत कार्यालयासमोर राज्य सरकारचा निषेध करून विविध मागण्याचे निवेदन प्रांतधिकाऱ्यांना देण्यात आले. शेतकऱ्याच्या दूध आणि भुकटीला दर मिळावा म्हणून हे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधी आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या.
महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षा सुरू असल्याने सोमवारी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दिपक भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदनाबरोबरच दुधाची पिशवी देऊन किंमतीकडे लक्ष वेधले.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही, राज्य सरकारने दूध आणि दुधाच्या भुकटीला दर द्यावा, मुख्य बाजारपेठा बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतात तसाच पडून आहे. जर राज्य सरकारने या निवेदनची दाखल घेतली नाही तर सरकार विरोधात 1 ऑगस्ट रोजी राज्यात दुधाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा महायुतीकडून देण्यात आला. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.