सोलापूर - शहरातील पाच्छा पेठ भागातील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. पाच्छा पेठेतील एक व्यक्ती रविवारी कोरोनामुळे मृत्यूमूखी पडला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी केल्यानंतर हा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला आहे. आत्तापर्यंत सोलापुरात एकूण 14 कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून एकाचा रविवारीच मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापुरात आत्तापर्यंत 669 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 504 व्यक्तींचे अहवाल आले आहेत. त्यातील 490 व्यक्तीचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. 14 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. 14 पैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सोलापूरात 12 एप्रिलपर्यंत कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता. मात्र अचानक कोरोनाच्या रूग्णाच्या संख्येत वाढ होत चालली आहे. एकाच दिवशी 10 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर प्रत्येक दिवशी त्यात एका रूग्णाची भर पडत आहे. कोरोनाबाधित 13 जणांवर सोलापुरातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अजूनही 165 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. या 165 जण हे सध्या असलेल्या 12 पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे सोलापूरकरांमध्ये अजूनही धाकधूक कायम आहे.