सोलापूर - मैत्रीण घरी आहे का, हे पाहण्यासाठी मैत्रीणीच्या मामाच्या घरी गेलेल्या १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. बार्शी तालुक्यात ही घटना घडली. याप्रकरणी आकाश उर्फ अक्षय प्रकाश मुळे (वय २५) याच्यावर पोक्सो अन्वये बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला (उंब्रज, ता. कराड जि.सातारा) येथून अटक केली आहे.
वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचार झाल्याचे आले समोर -
पीडित मुलगी आरोपीच्या घरी तिच्या मैत्रीणीसाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे पीडितेने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. काही दिवसांनी पीडितेला पोटदुखीचा त्रास होवू लागल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी झाली. तेव्हा मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. यानंतर मुलीने आईला झालेला प्रकार सांगितला.
आरोपीला अटक -
पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन आकाश उर्फ अक्षय मुळे विरुद्ध गुन्हा दाखल झाला. या घटनेची गंभीरता पाहता सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी पोलिसांच्या पथकाने आरोपी आकाशला कराडमधील उंब्रज येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.