माढा(सोलापूर) - माढा तालुक्यातील केवड गावात चोरी झाल्याची घटना 24 एप्रिलला घडली होती. घराला कुलूप लावुन छतावर मित्रासमवेत झोपले असता घराचे कुलूप तोडुन सोन्यासह रोख असा
७ लाख ९९ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मित्रानेच मित्राच्या घरात चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
केवड गावात २४ एप्रिलच्या पहाटे मनोहर सुभाष पाडोळे यांच्या घरात चोरी झाली होती. या प्रकरणी पाडोळे यांनी केलेल्या तकारारीनुसार यांनी तपास सुरू होता. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी एकाच आठवड्यात घटनेचा छडा लावला. त्यावेळी मित्रानेच मित्राच्या घरी चोरी केल्याचे तपासातुन समोर आणले आहे. विजय बिरमल घुले (रा.केवड ता.माढा) असं त्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना त्याने गुन्ह्याची कबुली देऊन घरात लपवुन ठेवलेला ऐवज पोलिसांच्या हाती दिला.
काय आहे प्रकरण-
मनोहर पाडोळे हे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात. कोरोना लाॅकडाऊनमुळे ते मुळ गावी केवडला आले होते. २३ एप्रिल रोजी सायंकाळी जेवण करुन मनोहर हे संतोष सावंत, विजय घुले, अमोल धर्मे या तिघा मित्रा समवेत घराच्या छतावर झोपले होते. झोपण्यास जाण्यापुर्वी मनोहर व संतोष सावंत या दोघांनी अंगावरील सोन्याचे दागिने व रोख १ लाख रक्कम असा ७ लाख ९९ हजारांचा ऐवज कपाटाच्या लाॅकरमध्ये ठेवुन लाॅकरची चावी तिथेच ठेवली होती.
सर्वजण झोपल्यानंतर विजय घुलेची नियत बदलली आणी छतावरुन खाली येऊन बंद घराचे कुलूप तोडुन त्याने तो ऐवज चोरला होता, तशी कबुली देखील विजय याने पोलिसांना दिली आहे. मागील १५ दिवसापुर्वी माढा पोलीस ठाण्यात रुजु झालेल्या श्याम बुवा यांनी ८ दिवसांत मुद्देमालासह आरोपी व घटनेचा छडा लावल्याने त्यांच्या कामगिरीचे समाजातुन कौतुक केले जात आहे.