सोलापूर - माघी वारी निमित्ताने विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून ३ लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारी निमित्त मंदिर समितीच्यावतीने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शिवाय विठूरायाला फुलाची आरास करण्यात आली आहे.
विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील मंदिर समितीच्या पत्राशेडपर्यंत गेली आहे. भाविकांना दर्शनासाठी १० ते १५ तास लागत आहे. वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांनी लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. हाती भगवा झेंडा घेऊन मुखी विठूनामाचा जयघोष करत आहेत. चंद्रभागा वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, कीर्तनात भाविक रंगले आहेत.
भाविक चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेकडे जात होते. मात्र, दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडपर्यंत गेल्यामुळे दर्शनासाठी भाविकांना ताटकळत बसावे लागले. वारीत अनेक सेवाभावी संस्थांच्यावतीने भाविकांना चहा, पाणी आणि फराळाचे वाटप केले जात आहे. तसेच ६५ एकर परिसरात भाविकांच्या राहण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.