सोलापूर - कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील 90 हजार 764 पुरुषांना, तर 59 हजार 629 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील संसर्ग कमी होत आहे. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णसंख्या व मृत्यूदराने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. शनिवारी (29 मे) सोलापूर शहरात 27 कोरोना रुग्ण वाढले. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी एकाच दिवसात ग्रामीण भागात 801 रुग्ण वाढले. तर 23 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सोलापूर ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाने काल (29 मे) 7 हजार 638 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 801 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. तर 23 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या उद्देशाने दररोज सरासरी 10 हजारांहून अधिक संशयितांची कोरोना टेस्ट केली जात होती. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्ण व मृत्यू वाढत असतानाही टेस्टचे प्रमाण जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने कमी करण्यात आले आहे. शनिवारी ग्रामीणमध्ये 7 हजार 638 संशयितांची टेस्ट करण्यात आली. शहरात दोन हजारही टेस्ट झालेल्या नाहीत. आजतागायत ग्रामीणमध्ये 1 लाख 22 हजार 263 रुग्ण आढळले आहेत. 2 हजार 564 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?
अक्कलकोट तालुक्यात 28, बार्शीत 134, सांगोल्यात 39 रुग्ण वाढले आहेत. करमाळ्यात 92 रुग्ण वाढले आहेत. माळशिरसमध्ये 174, मंगळवेढ्यात 33 रुग्ण वाढले, त्याठिकाणी प्रत्येकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर माढ्यात 132, उत्तर सोलापुरात 6 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात 23 रुग्ण वाढले. या तालुक्यातील प्रत्येकी तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मोहोळ तालुक्यात 26 तर पंढपुरात 114 रुग्ण वाढले. या दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने काल 1949 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 27 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर 61 रुग्णांनी कोरोना आजारावर मात केली आहे. शहरात काल फक्त एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयात 540 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
हेही वाचा - अभिनेत्रीचा लस घेण्यासाठी कारनामा; फ्रंटलाईन वर्करचे खोटे ओळखपत्र बनवून घेतला डोस