सोलापूर - जिल्ह्यात दररोज 900 ते 1000 रुग्ण नव्याने आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर स्थानिक प्रशासनाने विविध उपाययोजना करून 5 एप्रिलपासून कडक नियमावली लागू केली. विकेंड लॉकडाऊन लागू केले होते. यादरम्यान राज्यातील गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील पाचही शिवभोजन केंद्रावर प्रति केंद्र 175 प्रमाणे पाच 875 शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या जात आहेत. पण प्रत्येक केंद्रावर आज ही अनेक नागरिकांना उपाशी पोटी परत जावे लागत आहे. उपलब्ध थळ्यांची संख्या कमी पडू लागली आहे. पोटाची आग विझविण्यासाठी गोरगरीब येणारे लोक अधिक आहेत. त्यामुळे शिवभोजन जेवण कमी पडू लागले आहे. प्रत्येक केंद्राला कमीत कमी 200 ते 250 इतक्या थाळ्या दिल्या, तर सर्वांना मोफत पोटभर जेवण मिळेल, अशी आशा यावेळी व्यक्त केली.
सोलापुरात पाच ठिकाणी शिवभोजन -
राज्य शासनाने गोरगरीब व भुकेल्या नागरिकांसाठी लॉकडाऊन काळात मोफत शिवभोजन थाळी किंवा जेवणाची व्यवस्था केली आहे. सोलापूर शहरात बसस्थानक परिसरात 2 केंद्र, मार्केट यार्डमध्ये 1 केंद्र, अश्विनी रुग्णालय परिसरात 1 केंद्र, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 1 केंद्र असे पाच केंद्र आहेत. या केंद्रावर 175 जणांना मोफत शिवभोजन दिले जाते. एकूण सोलापूर शहरातील पाचही केंद्रावर 875 जणांना शिवभोजन दिले जाते. मात्र, भुकेने व्याकुळ झालेल्या गोरगरिबांची संख्या मात्र हजारांत आहे.
बोटांवर मोजण्या इतक्याच शिवभोजन थाळ्या -
सोलापूर शहर हे श्रमिकांचे किंवा कष्टकऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे भिक्षा मागणाऱ्याची संख्यादेखील वाढू लागली आहे. शहरातील अनेक मंदिरासमोर किंवा दर्ग्यासमोर अनेक जण भिक्षा मागताना आढळतात. यासाठी अनेक सेवाभावी संस्था पुढे येऊन त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करतात. पण प्रवाशी किंवा हमाल-मजूर वर्ग हे भिक्षा मागण्याची हिंमत करत नाहीत व उपाशी पोटी झोपी जातात. यावेळी त्यांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळतो. पण शिवभोजन थाळी हे मर्यादित स्वरूपात उपलब्ध होत असल्याने अनेक जण उपाशी राहत आहेत. या कष्टकऱ्यांसाठी किंवा मजुरांसाठी तसेच प्रवाशांसाठी शिवभोजन अन्नाचा उपलब्धता वाढवून मिळावी, अशी मागणी होत आहे.
लॉकडाऊन असल्याने सर्व हॉटेल बंद -
राज्यात लॉकडाऊन असल्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद आहेत. काही हॉटेल चालक लपवून खाद्यपदार्थ विक्री करत आहेत. तेही चढ्या दराने विक्री करत आहेत. यामध्ये शिवभोजनची साथ मिळत आहे. परंतु अनेकवेळा एका तासात 175 थाळ्या संपत आहेत. रोज सकाळी 11 ते 12 दरम्यान शिवभोजन थाळी वाटप केले जाते. 175 पेक्षा अधिक जण शिवभोजन थाळी आस्वाद घेण्यासाठी येत आहेत, पण लवकर संपत आहेत.
हेही वाचा - राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार, म्हणाले- एकत्रित संकटावर मात करता येईल