सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी संदर्भात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी प्रशासनाकडून पन्नास लोकांची परवानगी मिळाली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या 50 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला गर्दी केली होती. यामुळे प्रशासनाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल -
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने 21 मार्चला सकाळी 9 ते 12.30 या कालावधीत बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, याठिकाणी कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन झाले नाही. बैठकीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नव्हते. तर, कार्यकर्त्यांसह मंत्र्यांकडून सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन करण्यात आले. मात्र, प्रशासनाने फक्त कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केले. नियम मोडणाऱ्या मंत्र्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही.
पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल -
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा कार्याध्यक्ष संदीप मांडवे यांच्यासह 50 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. संदीप मांडवे यांनी प्रशासनाकडून परवानगी घेताना 50 लोकांच्या उपस्थितीत मेळावा घेणार असल्याची परवानगी घेतली होती. मात्र, मेळाव्याला दोनशे ते तीनशे कार्यकर्ते जमवल्यामुळे पंचायत समितीचे कर्मचारी मेघराज कोरे यांनी संदीप मांडवे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये मांडवे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.