पंढरपूर (सोलापूर)- माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अचानक दौरा केला. राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्या मुलाच्या विवाहासाठी शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. विधान परिषदेच्या सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेसंदर्भात पवारांसोबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर खासदार शरद पवार हे पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन जानकर यांचा सांगली जिल्ह्यातील जत येथील सुभाषराव माने पाटील यांची कन्या स्नेहल यांच्यासोबत शनिवारी विवाह संपन्न झाला. या विवाह निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुपारी अडीचच्या सुमारास हेलिकॉप्टरने वेळापुरात दाखल झाले होते. जानकर यांच्या घरी साधेपणाने पार पडलेल्या विवाह सोहळ्यात शरद पवारांनी उपस्थिती लावून वधूवरास आशीर्वाद दिले.
सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची विवाह समारंभाला हजेरी-
जानकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, आमदार यशवंत माने, जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार दीपक साळुंके, श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्यासह असंख्य जिल्ह्यातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील आगामी होणाऱ्या निवडणुका बाबत चर्चा..
सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखला जातो. त्यामुळे खासदार शरद पवार यांची जिल्ह्यावर पकड मजबूत आहे. मात्र, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यातच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी शरद पवार यांनी चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर विधान परिषद निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि इतर निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून दिलीप माने यांच्यासह उमेश पाटील, राजन पाटील यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.