मुंबई - आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दरम्यान मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
पंढरपूर मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर, त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादीकडून आदरणीय शरद पवारसाहेबांच्या मान्यतेने भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. पंढरपूर मतदारसंघातून ते नक्की विजय होतील, असं ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.
कोण आहेत भगीरथ भालके?
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 17 एप्रिल रोजी पोट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला ही जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना तिकीट द्यायचे की, त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तिकीट द्यायचे यावरून संभ्रम होता. अखेर भगीरथ भालके यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. भगीरथ भालके हे विठ्ठल सहकारी कारखान्याचे दहा वर्षांपासून संचालक आहेत.
जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दाखल करणार अर्ज
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 मार्च हा उमेदवारी भरण्याचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवशी राष्ट्रवादीकडून भगिरथ भालके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपाकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी
पंढरपूर, मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून दामाजी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष समाधान महादेव अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार प्रशांत परिचारक यांनी अवताडे यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. याबाबत अधिकृत घोषणा भारतीय जनता पार्टीकडून लवकरच करण्यात येणार आहे. समाधान अवताडे हे उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके विरूद्ध समाधान अवताडे असा सामना रंगणार असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. यात कोणा बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - 'दीपाली चव्हाणने मृत्यूपुर्वी लिहिलेले पत्र नीट वाचा अन् रेड्डीला सहआरोपी करा'