सोलापूर (पंढरपू) - गेल्या काही दिवसांपासून दररोज इंधन दरवाढ सुरू सुरू आहे. या वाढत्या महागाईमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती वापरातील गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे आणखी जास्त हाल केले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उज्वला गॅस सिलेंडर टाकीला दुधाचा अभिषेक घालून अनोखे आंदोलन केले. दरम्यान, मोदी सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजीही देण्यात आली.
गॅस टाकीला दुधाचा अभिषेक
इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आंदोलन करत, मोदी सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. तसेच, पंढरपूर येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी उज्वला गॅस सिलेंडरच्या टाक्यांना दुधाचा अभिषेक घालून इंधन दरवाढीचा निषेध केला आहे. केंद्र सरकारने तत्काळ दरवाढ मागे घ्यावी व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप मांडवे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून टांगा मोर्चा
गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने इंधनाची दरवाढ करत आहे. यामध्ये प्रामुख्याने डिझेल, पेट्रोल आणि गॅसचे दर भरमसाठ वाढले आहेत. आधीच कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती मेटाकुटीला आलेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध करण्यात आला. पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर केंद्र सरकारकडून इंधनात भरमसाठ दरवाढ करण्यात आली.
संपूर्ण जिल्ह्यात केंद्र सरकारचा निषेध
सोलापूर जिल्ह्यातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्र सरकार व इंधन दरवाढीविरोधात मोठा आक्रोश पाहायला मिळाला. यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर, माळशिरस, सांगोला, करमाळा, मंगळवेढा, माढा तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा जाहीर निषेध केला. दरम्यान, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यामध्ये जिल्ह्याभरातील राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ही इंधन दरवाढ मागे घ्यावी यासाठी प्रशासनाला विविध ठिकाणी निवेदनही देण्यात आले.