हैदराबाद - नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'चा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राच्या नवदुर्गा कार्यक्रमात सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सोलापुरात राबवत असलेल्या ऑपरेशन परिवर्तनमुळे कसा हातबट्टी दारूच्या निमिर्ती, वितरण आणि सेवनावर नियंत्रण आणण्यात आले, याबाबत माहिती. दिली. तसेच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी महिलांनी स्वत:ला कमी समजू नका. आईची भूमिका निभावताना मुला-मुलींना समान संधी द्यावी, असा संदेश दिला.
प्रश्न - तेजस्वी मॅम, तुमचा सध्या ऑपरेशन परिवर्तन उपक्रम सध्या चर्चेत आहे? याबद्दल काय सांगाल.
उत्तर - ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम हातबट्टीची अवैध दारूची निर्मिती, वितरण, विक्री आणि सेवन करणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून राबवला जात आहे. सोलापुरमध्ये रुजू होण्यापूर्वीही असं ऐकलं होतं की, याठिकाणी मोठ्या प्रमाणात हातबट्टीच्या दारुची निर्मिती होते. इथे आल्यानंतर ते पाहायला मिळालं की अवैध दारू लाखो लोकांकडून सेवन केले जाते. मोठ्या प्रमाणात तिचे वितरण केले जाते. यामुळे हे थांबविण्यासाठी नेहमीच्या उपायांपेक्षा म्हणजे छापा टाकणे, गुन्हे दाखल करणे, अटक करणे यापेक्षा काहीतरी वेगळे काहीतरी करायचं लक्षात आलं. कारण या गोष्टी गेल्या अनेक वर्षांपासून आपण करत आहोत. मात्र, तरी हे थांबलेलं नाही. म्हणून यासाठी चार टप्प्यांवर हा उपक्रम राबविण्यात आला.
- पहिला टप्पा म्हणजे धाडी टाकणे आणि त्या नियमित टाकणे - उदा. एक महिन्यानंतर छापा टाकल्यानंतर मधले 29-30 दिवस ती व्यक्ती तो व्यवसाय चालू ठेवते. आणि एका दिवसात होणारे नुकसान आणि उरलेल्या 30 दिवसांमध्ये होणारा फायदा हा जास्तच असतो. त्यामुळे आपण एकदा नष्ट केल्यावर कारवाई केल्यावर पुन्हा तो व्यक्ती आपला व्यवसाय सुरू करतो. म्हणून प्रत्येक तिसऱ्या दिवशी त्याठिकाणी भेट द्यायची आणि त्याठिकाणी हातबट्टी मिळाली तर ती नष्ट करायची आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करायची, हा पहिला टप्पा होता.
- दुसरा टप्पा म्हणजे समुपदेशन - कारवाई झाल्यावर बऱ्याच वेळेला अटकेच्या भीतीने आरोपी पळून जातात आणि समुपदेशनसाठी ते मिळून येत नाही. अशावेळी त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करणे. त्यांनासुद्धा अटकेची प्रक्रिया, पुन्हा बेटआऊट होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, तेव्हा त्यांचंही समुपदेशन होईल. असं समुपदेशन करायचं ठरवलं होतं. यात सर्वप्रथम त्यांना या गोष्टीची जाणीव करुन द्यायची होती की, तुम्ही जे करत आहात, ते कसे चुकीचे आहे, अवैध आहे. तसेच तुम्हाला आम्ही ते परवडू देणार नाही. महिन्यातून एखाद्या वेळेला आम्ही आलो तर तुम्हाला ते परवडेन. मात्र, प्रत्येक दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी आम्ही आलो आणि नष्ट केले तर तुम्हाला ते परवडणार नाही. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या एखाद्या धंदा करा, याबाबत इच्छा निर्माण करणं. या समुपदेशनातून त्यांना दुसऱ्या एखाद्या व्यवसायाबाबत जाणीव निर्माण करुन देणं, त्यांना या विचारापर्यंत आणणं की ठिक आहे, आता आपल्याला हे परवडणारच नाही आणि पोलीस म्हणतात तसं ते आपल्याला मदत करायला तयार आहेत तर आपण इतर व्यवसायांचा विचार करुया.
- तिसरा टप्पा म्हणजे पुनर्वसन - यात अनेक गोष्टी आहेत. आपल्याकडे असे विभाग आहेत त्यात नवीन लघु उद्योगांसाठी, शेतीसाठी, फळबागा लागवडींसाठी अनेक प्रकारचे कर्ज मिळते, सबसिडी मिळते. फक्त यासाठी समोरच्या व्यक्तीला माहिती त्यांना द्यायची. ती मदत मिळवून द्यायची. त्यासाठी प्रयत्न करायचे.
- चौथा टप्पा म्हणजे जे सेवन करतात त्यांच्यासाठी जागृती मोहिम राबवायची आहे. त्यात त्यांना सांगयचे की, तुम्ही जी दारु सेवन करत आहात, ते किती धोकादायक आहात, किती त्रासदायक आहे. आतापर्यंत गेल्या 50 वर्षात गावठी हातबट्टीची दारुने झालेले मृत्यू, कुटुंबीयांचे नुकसान इत्यादी गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देणे.
म्हणजे एकीकडे त्या दारुची मागणी कमी करणं, त्या दारुची निर्मिती कमी करणं, तिसरीकडे जे दारुची निर्मिती करतात त्यांचं पुनर्वसन करणं, यानंतर त्यांचं समुपदेशन करणं या चार गोष्टी ऑपरेशन परिवर्तनमध्ये आहेत. मागील 4-5 महिन्यापासून हे काम सुरू आहे. मागील दीड महिन्यापासून समुदेशन सुरू केले आहे. यामाध्यमातून 2000 समुपदेशन सत्र राबविण्यात आले. आधीच्या तुलनेत जर आता विचार केला तर पहिल्यांदा छापा टाकण्यात आला तर तेव्हा हातबट्टीची दारू किती मिळाली, त्यानंतर छापा टाकला तर ती किती मिळाली. महिन्याभरात 8 ते 10 वेळा टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये दारु ही कमी मिळाली. यात 60-70 टक्के दारु ही कमी झालेली पाहायला मिळाली. ही सकारात्मक बाब आहे.
यासोबतच समुपदेशनच्या माध्यमातून 600 कुटुंबांचे अर्ज भरण्यात आले आहेत. त्यात त्यांना कोणता व्यवसाय करायचा आहे, याबाबत नोंद करण्यात आली आहे. यात कोणी शेळीपालन, फळबागा, मजूरी, एमआयडीसीमध्ये काम मिळवून देण्याबाबत, मिरची कांडप, दुग्धपालन आदी. व्यवसाय करण्याबाबत सांगितले आहे. आता त्यावर काम सुरू आहे. यात 50 पेक्षांपेक्षा जास्त कुटुंबांचे विविध व्यवसाय सुरू झाले आहेत.
प्रश्न - कोरोना काळात तुम्हाला बाहेर सेवेसाठी जावं लागलं. यादरम्यान, तुमच्या पतीने स्वयंपाक केला, तुमचा युनिफॉर्मही प्रेस करुन दिला, याबाबत तुम्ही एक व्हिडिओ शेअर केला होता, याबाबत काय सांगाल?
उत्तर - खूप अभिमान वाटतो. तो व्हिडिओ शेअर करण्याची दोन कारणे होती. माझे पती फार सोशल आहेत. ते खूप लोकांना भेटतात. त्यामुळे त्यांच्या मित्रांना असं वाटलं की, इतका खटपट्या माणूस घरात कसा बसला. ते त्याच्या मित्रांना सांगायचे की आज मी हा स्वयंपाक केला, हे जेवण बनवलं. तर मग त्यांना त्यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे वहिणी आमचा मित्र घरात कसाकाय बसला? त्यांचे मित्र मला विचारायचे. यामुळे मग त्यांना दाखविण्यासाठी तो व्हिडिओ केला. मी दिवसभर बाहेर असायचे. माझी मुलगी घरी असायची. माझे आईवडीलही त्यावेळी साताऱ्यात आले होते. माझ्या छोट्या बहिणीची डिलीव्हरी होती. माझी आई तिच्याकडे होती. या कालावधीत डबे देणे त्यांची काळजी घेणे तो करत होता. याचा आम्हाला कौतुक आहे. या दरम्यान तो चपात्या करायला शिकल्या. याआधीही तो या गोष्टी करायचा. मात्र, आता अधिक वेगाने तो कामे करायला लागला. एक दिवस मीच त्याचे सगळे व्हीडीयो आणि फोटो एकत्र केले आणि सोशल मिडीयावर टाकले. त्या कळात घरेलू हिंसाचे प्रमाणात वाढ पाहण्यास मिळाली. तेव्हा मला समजले की, आपल्याच घरात एक आदर्श वर्तन करणारी व्यक्ती आहे. त्यावेळेस घरातल्या बाईवर आदेश सोडणारे, तिची काम वाढवणारे. बाहेरील फ्रस्ट्रेशन घरातील महिलेवर काढतो आहे. यामुळे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढते आहे. यात घरातील महिला व्यस्त असताना पुरूष घरातील कामे करतो हे सकारात्मक चित्र माझ्याच घरी आहे. हा व्हिडिओ पोस्ट करण्यामागे हाच विचार होता.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या नवदुर्गा : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने डॉ. मीरा बोरवणकरांचा महिलांना मोलाचा सल्ला...
प्रश्न - बलात्कारासारख्या घटना घडू नये, यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात? सोलापूर एसपी म्हणून तुम्ही यासाठी काय उपाययोजना केल्यात?
उत्तर - मला असं वाटतं की समाज म्हणून आपण आपल्या सर्वांमध्ये जागरुकता आणायला हवी. आपल्या आजूबाजूला वाईट घडत असेल, तर आपल्याला त्यासाठी अलर्ट राहावे लागेल. महिलांना जास्त अलर्ट राहावे लागेल. आपल्याला माहित नसतं की कधी कोणता प्रसंग आपल्यावर कसा येईल, त्यामुळे अलर्ट राहावे लागेल. महिला अत्याचारांच्या संदर्भात त्याबाबत छोट्यात छोट्या कृत्याची दखल पीडित, समाज आणि पोलीस म्हणून सर्वांनीच घ्यायला हवी. फक्त शिटी जरी कुणी मारली असेल आणि पीडितेला तो विनयभंग वाटत असेल, तिच्या इच्छेविरुद्ध घडला असेल, तर त्याबाबत तक्रार करायला हवी. अनेकदा असे छोटे छोटे प्रसंग घडतात. मात्र, त्याविरुद्ध तक्रार न केल्यामुळे आरोपीकडून आणखी गंभीर प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे हे संयुक्त प्रयत्न असावेत. आपण सर्वांनी अधिक संवेदनशील व्हावं, जागरुक व्हावं असं मला वाटतं.
प्रश्न - नवरात्रीच्या निमित्ताने महिलांना, युवतींना काय संदेश द्याल?
उत्तर - सर्व माता-भगिनींना हीच विनंती आहे की, आपल्या सुरक्षेचा आणि आपल्या जागरुकतेचा प्रत्यक्ष संबंध आहे. आपण स्वत:ला कधीही कमी लेखू नये. आपल्या घरातील मुलांना आणि मुलींना समानतेने वागणूक द्यावी. आपल्या मुलींना समानतेने संधी द्या. ही घरातील आईच्या हातात आहे. स्वत:चा सन्मान करा. त्यामुळे लवकरच समाज समानाधिष्ठित समाजाच्या दृष्टीने अधिक गतीशिलतेने वाटचाल करेल.