सोलापूर - पेट्रोल-डिझेल, तसेच गॅस दरवाढीच्या विरोधात सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपावर प्रतिकात्मक चूल मांडून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. आज दुपारी डफरीन चौकातील सुपर पेट्रोल पंप येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'अच्छे दिन' आणण्याचे आश्वासन देणाऱ्या होर्डिंग समोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
हेही वाचा - दिलासादायक! सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 50 हजार जणांची कोरोनावर मात
केंद्र सरकारच्या महागाई विरोधात निदर्शने
महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलेल्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या महागाईला सातत्याने चालना देणाऱ्या धोरणांचा निषेध केला. मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडली असून त्यामध्ये आता गॅस दरवाढीची भर पडल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाल्याचे सांगून, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.
फेब्रुवारी महिन्यात सलग तीन वेळा गॅस दरवाढ
गॅसचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. फेब्रुवारी महिन्यात सलग तीन वेळा गॅसची दरवाढ झाली. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. गृहिणींना संसाराचा गाडा चालवणे अवघड झाले आहे. दोन वेळ जेवणाची भ्रांत असताना केंद्र सरकारला जनतेविषयी थोडीही सहानुभूती नाही. त्यामुळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शहरातील सुपर पेट्रोल पंपावर चूल मांडून आंदोलन करण्यात आले. 4 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली. 15 फेब्रुवारी रोजी 50 रुपयांची वाढ झाली, तर फेब्रुवारी महिन्या अखेरीस गॅस दरात 25 रुपयांची वाढ झाली.
हेही वाचा - पंढरपूर पोलिसांनी वाळू माफियांविरुद्ध केलेल्या दोन कारावायांमध्ये 9 जणांविरोधात गुन्हे दाखल