सोलापूर - अतिवृष्टी झाल्याने अनेक ग्रामस्थ पाण्यात अडकले आहेत. नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत असल्याने काही ठिकाणी रस्ते जलमय झाले असून यामुळे गावांचा संपर्क तुटलाय.
नीरा, भीमा, सीना, भोगावती या नद्यांना देखील प्रचंड पाणी आले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. पुरात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने एनडीआरफीचे पथक रावाना केले आहे. या टीमने घटनास्थळी पोहोचून तत्काळ बचावकार्याला सुरुवात केली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील कुरुनूर धरणातून बोरी नदीत, सीनाकोळगाव धरणातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीकाठच्या गावांना या पुराचा फटका बसला. जिल्ह्यातील नागझरी, भोगावती या नद्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. नदीकाठच्या गावातील नागरिक या महापुराने प्रभावित झाले आहेत. या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे 18 जवान दाखल झाले आहेत.
मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी या तालुक्यातील गावांना सर्वाधिक पुराचा फटका बसला आहे. एनडीआरएफचे जवान महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या मदतीने पुरात अडकलेल्यांचे बचावकार्य सुरू आहे. गुरुवारी सकाळपासून जवानांनी 30 ते 40 शेतकऱ्यांना वाचवले आहे. तसेच महापुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी स्वतः एनडीआरएफ च्या जवानांसोबत बचाव कार्यात मदत करत आहेत.
नागझरी नदीच्या बाजूला ग्रामस्थ सागर करंडे हे 17 तास प्राण हातात घेऊन झाडावर बसले होते. त्यांना वाचवण्यात यश आले आहे. महसूल प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, एनडीआरएफच्या जवानांनी सागर यांना सुखरुप बाहेर काढले. बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील युवकाला गुरुवारी पहाटे 5 च्या सुमारास महापुरातून वाचवण्यात यश आले.
पुरामुळे तालुक्यातील जनजीवन धोक्यात
अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर या तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून बचाव पथकं घडनास्थळी दाखल झाली आहेत. एनडीआरएफचे जवान या तीन तालुक्यातील गावांमध्ये अडकलेल्याना वाचवण्याचे कार्य युद्धपातळीवर करत आहेत.