पंढरपूर - मराठा आरक्षणावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. 'शरद पवारांना मराठा समाजाच्या प्रश्नांची जाण असून त्यांनी अनेक आयोगांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले असते. मात्र, ते का मिळू शकले नाही, याबद्दल शरद पवारच सांगू शकतील, असे त्यांनी म्हटले आहे. आज मराठा आरक्षणासाठी पंढरपूरमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
'...म्हणून मराठा समाजामध्ये फूट' -
छत्रपती संभाजीराजे आणि आम्ही मराठा आरक्षणासाठी काम करतो. महाविकास आघाडी सरकार किंवा भाजपा यापेक्षा मराठा आरक्षण महत्त्वाचे आहेत. प्रत्येक पक्षात मराठा समाजाचे नेते आहेत. सध्या सत्तेत असणारी मराठा समाजातील नेते समाजासाठी बाहेर पडत नाही. त्यातूनच मराठा समाजामध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या कल्याणासाठी पुन्हा मोर्चे काढणार असल्याचा इशारा यावेळी नरेंद्र पाटील यांनी दिला.
'युतीच्या काळात मराठा समाजाला आरक्षण' -
राज्यात ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीत मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडण नाही. मराठा समाज व ओबीसी समाज एकत्र आला, तर राज्य सरकारला लवकरच आरक्षणाचा निर्णय निकाली काढावा लागेल. राज्यातील राजकारण यांची जर इच्छा असती, तर मराठा समाजाला 1980 साली आरक्षण मिळाले असते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शासनामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळू शकले नाही. मात्र, युती सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - वादाला फुटले नवे तोंड; ट्विटरने नकाशातून वगळले जम्मू काश्मीर!