सोलापूर - न्याय हवा असेल तर आता 'लोकशाही जोडा, अन ईव्हीएम फोडा' असा नवा नारा साताऱयाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापूरात दिला. उदयनराजे सध्या सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तीर्थाटन करण्याबरोबरच ग्रामीण भागातील दुष्काळी जनतेशीही थेट संवाद साधत आहेत. गुरुवारी त्यांनी पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणीचे आणि आज तुळजापूरच्या तुळजाभावनीचे दर्शन घेतले.
शुक्रवारी त्यांनी सोलापुरातल्या सिद्धेश्वर मंदिर आणि शाहजहूर अली दर्ग्याला भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दुष्काळ, सरकारची धोरणे, ईव्हीएम आणि तंत्रज्ञान अशा कळीच्या मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी ईव्हीएमला विरोध दर्शविला. ईव्हीएम सारखी इलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रिया ही सदोष असल्याचे लक्षात आल्यानंतर अमेरिका आणि जपानसारख्या प्रगत राष्ट्रांनी बॅलेट पेपर आधारित निवडणूक प्रक्रिया अंगीकारली आहे. मग आपल्या लोकशाहीप्रधान देशात ही प्रक्रिया का नाही? असा सवालही उदयनराजे यांनी उपस्थित केला.
२०१४ निवडणुकीतली आकडेवारी गहाळ आहे. असा खुलासा एका खासगी वेबसाईटवर करण्यात आला. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली तर कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे कायद्यात प्रयोजन केले आहे. त्यामुळे आपण काहीच करु शकत नाही. म्हणून न्याय हवा असेल तर 'लोकशाही जोडा अन ईव्हीएम फोडा' असा आपला नारा असल्याचे खासदार उदयनराजे यांनी म्हटले.