पंढरपूर: माण तालूक्यातील थदाळे येथील गजानन सर्जेराव वावरे (वय-58) हे नाशिक येथील महिंद्रा कंपनीत (Mahindra Company) नोकरीस होते. ते आई हिराबाई सर्जेराव वावरे (वय-75) समवेत सोसायटीच्या मतदानासाठी गावी आले होते. मंगळवारी ते आई सोबत नाशिककडे निघाले होते. शिंगणापूर- नातेपुते मार्गावरील भवानी घाटातून जात असताना त्यांचा कारवरील ताबा सुटला की कार डोंगराच्या दोन टप्प्यावर आदळून दरीत कोसळली.
यात गजानन वावरे व हिराबाई वावरे या मायलेकाचा जागीच मृत्यू झाला तर कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाता नंतर शिंगणापूर व पिंपरी येथील 30 ते 40 साहसी युवक मदतकार्यासाठी अपघातस्थळी पोहोचले. यामध्ये वीरभद्र कावडे, शंकर तांबवे, आनंद बडवे, अनिल कर्चे, मिथुन कर्चे, अक्षय शेंडे, अमोल राऊत, विकास मदने, विशाल कर्चे यांनी दरीत उतरून दोन्ही मृतदेह दोरखंड व मानवी साखळीच्या मदतीने वर काढले. मायलेकरांचा अपघाती मृत्यू मुळे थदाळे गावावर शोककळा पसरली आहे. गजानन वावरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.नातेपुते पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.