सोलापूर : कॉंग्रेसने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह माजी आमदारांनी जिल्हा निरीक्षकांकडे केली आहे. प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी देखील सर्वानुमते काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची शिफारस हायकमांडकडे करणार असल्याची माहिती, पत्रकार परिषदेत दिली. माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी देशाला सुशीलकुमार शिंदे यांची गरज असल्यामुळे प्रणिती आणि सुशीलकुमार या दोघांची नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवा, असे सांगितले.
2014 पासून शिंदे घराण्याला घरघर : सोलापूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शिंदे घराण्याच वर्चस्व आहे. मोदी लाटेत 2014 पासून शिंदे शाहीला घरघर लागली होती. सुशीलकुमार शिंदें यांनी देखील वयोमानानुसार राजकारणातून निवृत्त होणार असे अनेकदा जाहीर केले आहे. लोकसभेच्या निवडणूकीत 2019 साली काँग्रेसला मजबूत उमेदवार न मिळाल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उभे राहावे लागले होते. यंदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवतील अशी माहिती बसवराज पाटील यांनी दिली.
बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक : सोलापूर शहरातील काँग्रेस भवनात सोमवारी सायंकाळी 14 ऑगस्ट रोजी प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते निर्णय झाला आणि आगामी सोलापूर लोकसभेची उमेदवारी विद्यमान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना देण्यात येणार असल्याची माहिती, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी, पदाधिकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. याबाबत देशपातळीवर प्रणिती शिंदे यांच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याची माहिती बसवराज पाटील यांनी दिली.
सुशीलकुमार शिंदेंच्या नावाची शिफारस : प्रदेश कार्याध्यक्ष काँग्रेस भवनात बैठक घेताना बसवराज पाटील यांनी एकमताने प्रणिती शिंदे यांचे नाव कळवू असे बैठकीच्या समारोपा वेळी सांगितले. काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते उभे राहिले आणि मत मांडू लागले. माझा कुणाला विरोध नाही पण सुशीलकुमार आणि प्रणिती या दोघांची नावे पाठवा असे ते म्हणाले. यावर ठीक आहे असे उत्तर बसवराज पाटील यांनी दिले.
डॉ जय सिद्धेश्वर महाराज अडचणीत आले : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजप खासदार डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या जातीच्या दाखल्यावरून ते अडचणीत आले आहेत. सर्वसामान्य नागरिक आजही अनेक प्रश्न निर्माण करत आहे. सोलापुरातील जात पडताळणी समिती समोर याबाबत सध्या सुनावणी सुरू आहे. जात पडताळणी समितीने यापूर्वी खासदार डॉ जय सिद्धेश्वर महाराजांचा जातीचा दाखल बनावट असल्याचा निर्णय दिला होता. समितीच्या निर्णयाविरोधात खासदारांनी अपील करत पुन्हा एकदा सुनावणी लावली आहे. जातीच्या दाखल्यामुळे डॉ जय सिद्धेश्वर महाराज हे अडचणीत आले आहेत. विद्यमान भाजप खासदारांना 2024 मध्ये भाजपकडून उमेदवारी मिळणार की नाही याबाबत भाजपने अजूनही स्पष्ट केले नाही. तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरोधात भाजप कोणता उमेदवार देणार याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -