सोलापूर - आमदार गोपीचंद पडळकरांवर सोलापुरातील मड्डी वस्ती येथे हल्ला झाला. यानंतर गोपीचंद पडळकर हे सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. हल्ला झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली होती. मुंबईहुन भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची फोनवरून विचारपूस केली आणि समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु गोपीचंद पडळकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी फोन वरून माहिती देताना पुन्हा एकदा शरद पवार यांना टार्गेट केले आणि माझं खुल आव्हान शरद पवारांनी स्वीकारावे, असे सांगितले.
'माझ्या प्रश्नावर शरद पवारांनी बोलतं व्हायला पाहिजे' -
हल्ला झाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची फोनवरून विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर तोफ डागली. शरद पवार हे महाराष्ट्र राज्यात समाजकारण करतात की माहीत नाही पण राजकारण मात्र नक्की करतात. मी गप्प बसणार नाही. यापुढे बोलत राहणार आणि शरद पवारांनी बोलतं व्हायला पाहिजे, असे ते फोनवर बोलताना म्हणाले.
'सभेत पवारांपेक्षा माझे अधिक लोकं येतील' -
शरद पवार यांना मी खुलं आव्हान करतो की, त्यांनी एका खुल्या मैदानात येऊन सभा लावावी आणि मी देखील त्याच मैदानात माझी सभा लावतो. पवारांपेक्षा अधिक लोकं माझ्या सभेला येतील. त्यांच्यापेक्षा अधिक लोकं माझ्या सभेला आली तर शरद पवारांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असे आमदार पडळकर फोनवरून आपल्या वरिष्ठांना सोलापुरमधून बोलत होते.