सोलापूर - पंढरपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला मद्य पाजतानाचा व्हिडिओ करून तिला ब्लॅकमेल करत 5 नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पंढरपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
घटनेतील 5 आरोपींपैकी पीडित मुलगी ही एकाची मैत्रिण होती. त्याने तिला एका अज्ञातस्थळी सुलभ शौचालयाजवळ बोलावले. त्यानंतर पाचही आरोपींकडून तिच्यावर बलात्कारासाठी दबाव टाकण्यात आला. यातील एका आरोपीने तिला छेडले तर दुसऱ्याने तिला दारू पाजून त्याचा व्हिडिओ बनविला. त्यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला.
मद्य पीत असल्याचा व्हिडिओ शेअर होईल, या भीतीमुळे पीडितेने ही घटना कोणालाही सांगितली नाही. याचाच फायदा घेत तरुणांनी तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. तिच्याकडे पैशांची मागणीदेखील करण्यात आली. या प्रकारामुळे पीडित तरुणीच्या वागण्यात फरक जाणवू लागला होता. त्यानंतर तिच्या आईने खडसावून विचारले असता, या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
पीडित तरुणीच्या कुटुंबीयांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी मनोज माने, साहील सुधीर अभंगराव, अक्षय दिलीप कोळी, आरिफ शेख, माऊली तुकाराम अंकुशराव या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. या सगळ्या प्रकारामुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.