सोलापूर - शहराच्या हद्दवाढ भागातील रस्त्याचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी मजरेवाडी ते कुमठे या जुन्या रेल्वेच्या मार्गावर पर्यायी रस्ता तयार करण्याचा आराखडा सादर करा, अशा सूचना राज्याचे सहकार मंत्री आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहराची हद्दवाढ झाल्यानंतर मागील तीस वर्षांमध्ये सोलापूर शहराच्या वाढीव हद्दीमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच कुमठे या गावाला जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची गरज आहे.
मजरेवाडी रेल्वे गेट पासून ते कुमठे गावापर्यंत जाण्यासाठी पर्यायी मार्ग उभा करण्याची आवश्यकता लक्षात घेता, रेल्वेची जुनी मीटरगेज लाईन असलेल्या ठिकाणावरून हा मार्ग करण्यासाठी महापालिका आणि रेल्वे विभागाची संयुक्त बैठक घेऊन, आराखडा तयार करा, अशा सूचना सुभाष देशमुख यांनी घेतलेल्या बैठकीत दिले आहेत.
वाढीव हद्दीतील विविध विषयावर चर्चा करण्यासाठी आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विशेष बैठक घेतली. या बैठकीमध्ये दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सोलापूर शहरातील वाढीव हद्दीतील रस्त्यांचा विकास आणि प्रश्न यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये मजरेवाडी रेल्वे गेट पासून ते कुमठे गावापर्यंत जाण्यासाठी रेल्वेच्या जुन्या मीटरगेज लाईन वरून नवीन रस्ता करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वाढीव हद्दीतील लाईटची सोय, एलईडीची कामे त्वरित पूर्ण करा, आणि संभाजी तलावाच्या शुद्धीकरणाचे काम सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू करण्याच्या सूचनाही सुभाष देशमुख यांनी यावेळी दिल्या .