सोलापूर : बोरणारे हे अत्यंत अभ्यासू आहेत. ते असे करणार नाहीत. परंतु या घटनेबाबत मला अधिक महिती नाही, अशी संजय राठोड यांनी माहिती दिली. संजय राठोड हे सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. वाशीम जिल्ह्यातील पोहरागड येथे संत सेवालाल यांच्या पावनभूमीत मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बंजारा समाजातील सर्व लोक या कार्यक्रमाला सहभागी होतील. यासाठी सोलापूर जिल्ह्यात आलो असल्याची माहिती, सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी सकाळी दिली.
चिंतन करू, जनता आमच्या पाठीशी : विधानपरिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला व शिंदे गटाला फटका बसला आहे. याबाबत प्रश्न विचारले असता, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत. जनता आमच्या पाठिशी आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून आम्ही निर्णय घेत आहोत. विदर्भात विधानपरिषद झालेल्या निवडणूक बाबत चिंतन करू, असेही नामदार संजय राठोड यांनी यावेळी बोलताना माहिती दिली.
विविध जिल्ह्यांचे दौरे : वाशीम जिल्ह्यातील पोहरागड येथे बंजारा समाजाचे संत सेवालाल यांचे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात बंजारा समाजातील व इतर समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी विविध जिल्ह्यांचे दौरे करत असल्याची माहिती, यावेळी संजय राठोड यांनी दिली. तसेच या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री, जलसंपदा मंत्री आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राठोड यांनी दिली. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे सोलापूर शहर, अक्कलकोट व मुळेगाव तांडा येथे जाऊन संवाद साधुन लातूर, उस्मानाबादकडे जाणार आहे. अशी माहिती यावेळी कार्यकर्त्यांनी दिली.
आदित्य ठाकरेंवर हल्ला : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे 7 फेब्रुवारीला औरंगाबाद दौऱ्यावर होते. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला होता. डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याचे समजले होते. महालगाव येथे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशा वेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्याने किरकोळ दगडफेक झाली होती.
तणावग्रस्त परिस्थिती : अशात बाहेर काही काळ गोंधळ बघायला मिळाला होता. काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले होते. त्याशिवाय काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचे समोर आले होते. यामुळे काही वेळ तिथे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. मेळावा संपल्यानंतर जयंती साजरी करत असलेल्या लोकांनी आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आदित्य ठाकरे यांची गाडी सुरक्षा रक्षकांनी व्यवस्थित बाहेर काढली होती.